पं.श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने सांगवीकर मंत्रमुग्ध

0

नवी सांगवी (प्रतिनिधी) – येथील कलाश्री संगीत मंडळ आयोजित कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पं. श्रीनिवास जोशी यांचे गायन झाले. त्यांनी राग मारुबिहाग मध्ये ‘रसिया आवो न जावो’ ही विलंबित एकतालात तर द्रुत तिनतालमध्ये ‘परिमोरी नाव मजधार में’ या बंदिशी सादर केल्या. त्यानंतर त्यांनी पं. भीमसेन जोशींच्या आवाजात अजरामर झालेले ‘बाजे रे मुरलीया बाजे’ हे भक्तीगीत गायले. त्यास रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली. त्यांना हार्मोनियमवर अविनाश दिघे, तबल्यावर प्रशांत पांडव, पखवाज गंभीर महाराज अवचार, टाळासाठी सदाशिव सावळे तसेच तानपुर्‍यासाठी मकरंद बाद्रायणी व दिगंबर शेडूळे यांनी साथसंगत केली.

पहिल्या सत्रात संदीप गुरव यांनी पुरीया कल्याण या रागामध्ये ‘गावे गुणी’ हा विलंबित एकतालामधील ख्याल सादर केला आणि बहुत दिन बिते हा तीन तालामधील छोटा ख्याल सुरेलरित्या सादर केला. त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकातील घेई ‘छंद मकरंद हे’ नाट्यगीत सादर केले तसेच माझे माहेर पंढरी हा अभंग सादर केला. गुरव यांना हार्मोनियमवर प्रभाकर पांडव, तबला दशरथ राठोड, पखवाज गंभीर महाराज अवचार, टाळ सर्वेश बाद्रायणी तसेच तानपुर्‍यासाठी दीपक गलांडे व सत्यवान पाटोळे यांनी साथसंगत केली.

रुचिरा काळेंचे गायन!
त्यानंतर रुचिरा काळे यांनी शुद्ध कल्याण या रागात येरी माई पिया हा बडा ख्याल तर छोट्या ख्यालात निंद न आवत व सुनो सखींरी या बंदिशीचे गायन तसेच सुप्रसिद्ध दादरा दिवना किए शाम क्या जादू डाला सादर केला. त्यांना हार्मोनियमवर गंगाधर शिंदे तर तबला साथ गणेश तानवडे यांनी व नम्रता महाबळ आणि धनश्री लोणकर यांनी तानपुरा साथ केली.

पूर्वा शहा यांचे बहारदार नृत्य!
डॉ. पूर्वा शहा यांच्या बहारदार कथ्थक नृत्याने महोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाची सांगता झाली. डॉ. शहा यांनी शिवस्तुतीने नृत्याची सुरुवात केली.त्यानंतर त्यांनी ताल तिनतालमध्ये उठाण, आमद व तुकडे सादर केले. नामदेव तळपे व प्राची पांचाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.