गैरहजर शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी; विद्यार्थी उघडतात वेळ-प्रसंगी शाळा; पदाधिकारी येताच अनुपस्थितांची उडाली भंबेरी
बोदवड । तालुक्यातील वरखेडे बु. येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला पंचायत समिती सभापती गणेश पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक गैरहजर असल्याचे दिसून आले. शाळेत सभापती आल्याची वार्ता कळताच अचानक केंद्रप्रमुख आणि शिक्षिका उपस्थित झाल्या, यानंतर ग्रामस्थांनी गर्दी करून शाळेत बायोमेट्रीक पध्दत सुरू करण्यात येऊन गैरहजर राहणार्या शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.
मुख्याध्यापक अडकले खाजगी क्लासमध्ये; शिक्षकांच्या उपस्थितीसाठी हवे थम्ब मशीन
नेहमीच शिक्षक उशिरा येत असल्याची तक्रार
या शाळेतील शिक्षक गैरहजर असल्यामुळे विद्यार्थीच येत नसल्याची हीअवस्था नित्याची बाब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिक्षिका उपस्थित झाल्यावर एक चावी मुख्याध्यापकाजवळ तर एक चावी विद्यार्थ्यांजवळ असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित शिक्षिका चावी शोधण्यासाठीं घाईने गावात गेल्या, शिक्षिका आल्यावर गावकर्यांसमोर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा ग्रामस्थांनी हे शिक्षक नेहमीच उशिरा येत असल्याची तक्रार केली.
मुख्याध्यापकांची हजेरी केवळ 30 मिनिटे
मुख्याध्यापक योगेश बोरोले हे हजरच राहत नाही आले तर फक्त 30 मिनिटे थांबतात. केंद्रप्रमुख रवींद्र भालेराव यांनी सांगितले की, गट शिक्षणाधिकार्यांना तोंडी सांगून जळगाव येथे पायाभूत परीक्षेच्या प्रश्नपत्रिका घेण्यासाठी पाठविले. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता पायाभूत प्रश्नपत्रिकांची वाटप करण्यात आले आहे. या प्रश्नपत्रिकांची नेहमीच गट शिक्षणाधिकारी धनके यांच्याकडून वेळेवर वाटप केली जात नाही. बाकीच्या प्रश्नपत्रिका झेरॉक्स करुन संबंधित शाळा पूर्ण करतात.
शिक्षक बदलीची मागणी
ग्रामस्थांनी शिक्षकांच्या बदलीची मागणी केली. योगेश बोरोले हे नेहमीच गैरहजर राहतात. याबाबत त्यांची तक्रार निमखेड शाळेत देखील झाली होती. बोरोले हे खाजगी क्लासेस चालवितात त्यामुळे शाळेकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. शाळेत बायोमेट्रीक पध्दत सुरू करण्यात यावी, अशा शिक्षकांची बदली न करता त्यांना निलंबित करण्यात यावे, संबंधित शिक्षकाने व्हॉट्सअॅप गृपवर दोन शिक्षक व 10 विद्यार्थी हजर दाखविले होते. प्रत्यक्षात शाळा भरली तेव्हा एकही शिक्षक व विद्यार्थी हजर नव्हता. गटशिक्षणाधिकारी धनके यांनी पदभार घेतल्यापासून शिक्षक गैरहजर राहत असल्याची तक्रारी होत असतानाही प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी धनके यांची प्रतिक्रीया घेण्यासाठी संपर्क साधला असता महत्वाच्या कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.