पक्की घरे तोडलेल्या 18 हजार रहिवाशांना आतापर्यंत हक्काचे घर नाही

0

मुंबई । वन जमिनीवर राहणार्‍या रहिवाशांची सरकारने पक्की घरे तोडली. परंतु, न्यायालयाच्या आदेशानंतरही सर्व रहिवाशांचे पुनर्वसन सरकारने केले नाही. 18 हजार रहिवासी आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित असून, त्यांना तत्काळ घरे द्या, या मागणीसाठी आज (मंगळवार) विधानभवनावर मुंबई झोपडपट्टी जनजागृती महासंघाचा मोर्चा धडकणार आहे. सकाळी 11 वाजता पाच हजार रहिवाशांचा मोर्चा विधानभवनावर धडकणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. वनजमिनीवर राहणार्‍या रहिवाशांना 20 वर्षे उलटूनही प्रशासनाने अद्याप घरे दिली नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज असंतोषाचा उद्रेक होणार असून, वन विभागातील नगरात राहणारे सर्व रहिवासी या भव्य मोर्चात सहभागी होणार आहेत.

मुंबई झोपडपट्टी जन जागृती महासंघाचा एल्गार
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमा भागात राहत असलेल्या भीमनगर, दामूनगर, गौतम नगर, क्रांतीनगर यांसारख्या भागांत आणि पाड्यांत राहणारे रहिवासी आजच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आज चटई, बांबूच्या झोपड्यात राहणार्‍या रहिवाशांचे 20 वर्षांपूर्वी पक्के घर होते. सरकारने ही घरे तोडली.

रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित
न्यायालयाच्या आदेशानुसार आहे त्याच जागेवर दोन वर्षांत रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले. परंतु, सरकारने फक्त 12 हजार नागरिकांचे पुनर्वसन केले. अद्याप सरकारने 18 हजार रहिवाशांचे पुनर्वसन केले नाही. पुनर्वसन न झालेल्या रहिवाशांना त्वरित घरे द्यावी, या मागणीसाठी मुंबई झोपडपट्टी जनजागृती महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विलासराव रोहीमल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. पाच हजार झोपडीधारक मोर्चामध्ये सहभागी होणार असून शासनाने याची दखल घेतली नसल्यास आंदालनावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी घेतली.

सरकारकडे करणार मागणी
भीमनगर नालंदा बुद्ध विहार मैदान येथून रहिवाशांचा मोर्चा निघणार आहे. यावेळी घरांच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती आझाद मैदान येथे शासनाला देण्यात येणार असून घरांची मागणी करण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत सर्व रहिवाशांनी विधानभवनावर मोर्चा काढण्याचे ठरवले होते. त्यानुसार वन विभागातील नगरात राहणार्‍या रहिवाशांच्या हक्कांच्या घरांसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.