बोदवड। तालुक्यातील शिरसाळा येथे दलित सुधार योजनेतून सन 2013-14 या आर्थिक वर्षात बांधण्यात आलेल्या काँक्रिट गटारीवर पीव्हीसी पाईप टाकून भूमिगत गटारीचे बांधकाम अधिकारी व पदाधिकार्यांच्या संगनमताने करीत आहे. अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुरेश नारायण कोळी रा. शिरसाळे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांच्याकडे तक्रार दिली आहे.
दलितवस्ती योजनेंतर्गत केले काम
बोदवड तालुक्यात शासनाच्या निधीच्या अपहाराच्या बाबतीत प्रसिध्द असलेली ग्रामपंचायत शिरसाळा येथे पुन्हा दलित वस्तीच्या निधीवर डोळा ठेवून अधिकारी व पदाधिकारी संगनमताने सन 2013-14 या वर्षात झालेल्या पक्क्या गटारीत पीव्हीसी पाईप टाकून खोदकाम न करता शासनाची फसवणूक करीत आहे. ज्याठिकाणी दलित वस्ती सुधार योजनेचे गटारीचे बांधकाम झाले आहे. ते काम मागील वर्षात केले आहे. काही ठिकाणी सहा इंची पीव्हीसी पाईप न वापरता चार इंची पाईप वापरला जात आहे. याबाबत शाखा अभियंत्यांना तक्रारदार सुरेश कोळी यांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, या कामाबाबत मला माहिती नाही तर या कामाचे लाईन आऊट, नियोजित कामाची जागा ही कोणी दाखविली. ग्रामपंचायत ठरावातील नकाशानुसार काम होते किंवा नाही याची सुध्दा चौकशी होणे गरजेचे आहे. या कामाची चौकशी झाल्याशिवाय देयके अदा करु नये. भूमिगत पीव्हीसी गटाराचे काम आमदगावच्या एका ग्रामपंचायत पदाधिकार्याने व गावातील ग्रामपंचायत सदस्याने ठेका घेतल्याची गावातील नागरिकांकडून बोलले जाते. या कामाची चौकशी झाल्याशिवाय पुढील निधीचा हप्ता वितरीत करु नये, असे सुरेश कोळी यांनी 1 रोजी निवेदनात म्हटले आहे.