पक्षप्रवेशावरून खडसे समर्थकांची सावरासावर

शिवसेनेत गेलेले ते पदाधिकारी राष्ट्रवादीचेच असल्याची पोस्ट व्हायरल

जळगाव – बोदवड येथील भाजपा पदाधिकारी पण खडसे समर्थक असलेल्या नगरसेवकांचा मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश झाला. पक्ष प्रवेशाच्या या बातम्या आल्यानंतर आज खडसे समर्थकांनी शिवसेनेत गेलेले ते नगरसेवक हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच असल्याची सावरासावर सोशल मीडीयावर सुरू केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कुणीही एकमेकांचे पदाधिकारी फोडुन आघाडी धर्म मोडु नये असा संकेत दिला गेला. मात्र जळगाव जिल्ह्यात या संकेताला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही शिवसेनेकडुन त्यांना ‘दे धक्का’ दिला जात आहे. मागील काही महिन्यापुर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे समर्थक पदाधिकार्‍यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला होता. आता शुक्रवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही बोदवडचे काही नगरसेवक फोडुन त्यांचा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करून घेतला. या पक्षप्रवेशासंदर्भात आलेल्या बातम्यांनंतर खडसे समर्थक जागे झाले. त्यांनी चक्क सोशल मीडीयावर शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांचे पक्षासह नावे नमूद करणारी पोस्ट व्हायरल केली आहे. असे असले तरी ते खडसे यांनी प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीचेच नगरसेवक असल्याचे भानही त्यांना राहीले नाही.
शिवसेनेला प्रत्युत्तरासाठी कैलास पाटलांचा उपयोग
ना. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत चोपड्याचे शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील व इंदिराताई पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ‘बोदवडच्या नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाला खडसेंचे जोरदार प्रत्युत्तर’ अशा आशयाची पोस्ट सोशल मीडीयावर खडसे समर्थकांकडून व्हायरल करण्यात आली आहे. एकुणच पक्ष प्रवेशावरून खडसे समर्थकांची ही सावरासावर चर्चेचा विषय ठरली आहे.
खडसे समर्थकांनी व्हायरल केलेली हीच ती नावे
देवेंद्र खेवलकर (मुळ राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडुन आलेले व राष्ट्रवादीचे गटनेते), सुशिलाबाई मधुकर खाटीक (मुळ राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडुन आलेले नगरसेवक), नगराध्यक्षा मुमताजबी सईद बागवान (१२ फेब्रुवारी रोजी जनसंवाद यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांच्या उपस्थितित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला होता), सकीनाबी सलिम कुरेशी (१२ फेब्रुवारी रोजी जनसंवाद यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांच्या उपस्थितित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला होता), आफरीन सय्यद बागवान (अपक्ष नगरसेविका), अकबर बेग मिर्झा (अपक्ष नगरसेवक), सुशिलाबाई आनंदा पाटिल (काँग्रेसच्या नगरसेविका), सुनिल कडु बोरसे (अपक्ष नगरसेवक), आसमाबी शेख इरफान (काँग्रेसच्या नगरसेविका).