तळेगावः पक्षविरोधी काम करणार्यांच्याच हाती मावळातील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे आहेत. या मंडळींनी केवळ स्वहिताचाच अजेंडा राबवत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे डोळेझाक केल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पीछेहाट सुरू आहे, असा घणाघाती आरोप तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किशोर भेगडे यांनी केला आहे.
तालुकाध्यक्षांना हटविण्याची मागणी
तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये तालुकाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे यांना हटविण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवक किशोर भेगडे यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी तालुकाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका केली.
त्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जून 1999 ला स्थापना झाली. अवघ्या सहा महिन्यांत पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागले. पहिल्या निवडणुकीत अधिकृत उमेदवार कृष्णराव भेगडे, सन 2004 चे अधिकृत उमेदवार मदन बाफना तर 2009 मध्ये बापूसाहेब भेगडे हे अधिकृत उमेदवार आणि सन 2014 मध्ये माऊली दाभाडे यांच्या रूपाने अधिकृत उमेदवारी होती. पक्षाच्या या चारही अधिकृत उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. या चारही जेष्ठांना विचारा की, बाळासाहेब नेवाळे यांनी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केलं का, असा सवाल भेगडे यांनी केला. ’पदरी पडलं अन पवित्र झाले’ या न्यायाने दादांनी त्यांना पक्षात ठेवले असले तरी त्यांनी इतरांना ’पक्षनिष्ठा ’ शिकवू नये, असेही भेगडे यांनी सुनावले.
त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दादांनी मावळ मधून अधिकृत उमेदवार म्हणून माऊली दाभाडे यांच्या नावाची घोषणा केली असतांना; पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत नेवाळे यांनी अपक्ष निवडणूक लढविली. तेव्हा कुठे गेली होती, पक्षनिष्ठा आणि पक्ष प्रेम, असा सवाल भेगडे यांनी उपस्थित केला.
नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा देणे आवश्यक
स्वहित कसे साध्य करता येईल याचा एक आदर्श नमुना म्हणजे पुत्रप्रेमाने आंधळे झालेले तालुकाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे यांनी त्यांच्याच जिल्हा परिषद गटात मुलाला उमेदवारी घेऊन निवडणुकीत पुरता पराभव होऊन तिसर्या क्रमांकाची मते पडली. अर्थात त्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. मात्र पदाला चिकटून राहिले, अशी टीका भेगडे यांनी केली. हट्टाने पदे मागून घेता, साधा उमेदवार निवडून आणता येत नाही ही नामुष्की आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
नुसत्या भावकीमध्ये भांडणे लावून पक्ष विस्तार होत नाही. तुम्हांला पक्षाचे हित दिसले तर; स्वत:च्या मुलाला व नेवाळे यांनी भाच्याला उमेदवारी दिली. मग तालुक्यात पक्षाकडे यांच्या व्यतिरिक्त जनमानसात चांगली प्रतिमा असलेले, सक्षम उमेदवार नव्हते का? स्वतःच्या हट्टापायी पक्षाची हानी करायची ही कुठली रीत, हेच का पक्षाचे हित, असा सवाल भेगडे यांनी केला.
समांतर संघटना स्थापन केली
स्वत:च्या फायद्यासाठी पक्षाला समांतर अशी संघटना स्थापन केली आहे. हे दोघे मिळून कुणाचेही न ऐकता पक्षाचा मनमानी कारभार करतात. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा बैठकीस साधे निमंत्रण देत नाही. यांचा फक्त एकच कार्यक्रम आहे. पदे देऊन नियुक्त्या करणे आणि सत्कार समारंभ या व्यतिरिक्त काहीच नाही, असा शेराही भेगडे यांनी मारला.
तालुक्यात शैक्षणिक संस्था असूनही स्थानिकांची प्रवेशप्रक्रिया व वाढीव फी बाबतचे धोरण, स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यासाठी पक्ष पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. पॉलिटेक्निक, इंजिनीअर, आयटीआय झालेल्यांना शिकाऊ उमेदवार म्हणून तर कायमस्वरूपी नोकरीसाठी कंपन्यांमध्ये त्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून होणे जरुरीचे होते . ते आजतागत झालेले नाही.
निष्ठावान नेत्यांकडे धुरा देणे आवश्यक
पीएमआरडी व एमएसआरडीसीच्या रिंगरोड बाबत गावेच्या गावे बाधित झालेली असतांना त्या प्रश्नासाठी आंदोलन वा उपोषण केलेले कधी दिसले नाही. त्याचबरोबर एमआयडीसीच्या चौथ्या टप्प्याबाबत शेतकरी वर्गासाठी काय भूमिका पक्षाने निभावली आहे. शेतकरीवर्गाच्या पाठीशी उभे न राहता पक्षाने त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सोडवणूक केली नाही, या बाबत भेगडे यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचीच सत्ता असताना मावळच्या विकासासाठी किती निधी मंजूर करून कोणकोणत्या कामासाठी वापराला यांचा लेखाजोखा पक्षाकडे असावा. ज्या कामासाठी निधी मंजूर करून आणला ती कामे अंदाजपत्रकाप्रमाणे होतात की नाही, तसेच तालुक्यात चालू असणार्या विविध कामांचा दर्जा टिकविण्याबाबत लक्ष ठेवणे. अशा स्वरूपाच्या कामामध्ये पक्षाच्या माध्यमातून लक्ष पुरविले पाहीजे. तेथे लक्ष दिले गेले नाही, अशी टीका त्यांनी केली. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना पक्षाला पुन्हा चांगले दिवस यावे व जनमानसात पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी लोकांच्या प्रश्नांबाबत जाण असणार्या निष्ठावान नेत्यांकडे पक्षसंघटनेची धुरा देणे गरजेचे आहे, अशी मागणी भेगडे यांनी केली.