भाजपाचे आ.गिरीश महाजन यांचे आव्हान : ओबीसींना भाजपातूनच सर्वाधिक संधी
जळगाव – मुक्ताईनगर मतदारसंघात सातत्याने खडसेंचे मताधिक्य कमी होत होते. त्यामुळे यावेळेला अॅड. रोहीणी खडसे यांना पक्षाने तिकीट दिले. त्याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र झाल्याने रोहीणी खडसेंचा पराभव झाला. भाजपात कुणीही पाडापाडीचं काम करीत नाही. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. कुणी पक्षविरोधी काम केले असेल तर ते माजी आ. एकनाथराव खडसेंनी पुराव्यानिशी प्रदेशाध्यक्षांकडे न देता जाहीर करावे असे आव्हान भाजपाचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिले.
राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आज राज्यातील सिंचन प्रकल्पांना मिळालेल्या स्थगितीबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. दरम्यान माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी अॅड. रोहीणी खडसे व पंकजा मुंडे यांच्या पराभवावरून नेतृत्वावर आणि पक्षातील पदाधिकार्यांवर आरोप केले होते. यासंदर्भात आ. गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, राज्यात काही जागांवर भाजपाचा पराभव झाला. त्याची अनेक कारणे आहेत. मात्र एकनाथराव खडसेंनी जे आरोप केले आहेत त्यात तथ्य नाही. मुक्ताईनगर मतदारसंघात खडसेंचा शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांशी सातत्याने संघर्ष राहीला आहे. त्याठिकाणी अॅड. रवींद्र पाटील असतांना खडसेंना केवळ १२०० मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर मागील २०१४ च्या निवडणुकीतही साडे आठ हजाराचे मताधिक्य खडसेंना होते. त्यामुळे यावेळेला खडसेंना तिकीट न देता त्यांची कन्या अॅड. रोहीणी खडसे यांनी उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात मोठी टस्सल झाली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. कुणीही पक्ष विरोधी काम केले नाही. खडसेंना वाटत असेल तर अशा पक्षविरोधी काम करणार्यांची नावे प्रदेशाध्यक्षांना न देता ती पुराव्यानिशी जाहीर करावी असे आव्हानच आ. महाजन यांनी आज खडसेंना दिले.