पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी पक्षाविरोधात बोलल्यास आता चांगलेच महागात पडणार आहे. भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पक्षाविरोधात भूमिका मांडणार्या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.
लक्ष्मण जगताप यांना आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सरचिटणीस प्रमोद निसळ, शहर प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक नामदेव ढाके, माजी महापौर आर.एस.कुमार, चेतन घुले आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
महापालिकेत एकहाती सत्ता असतानाही सत्ताधारी भाजपाचे नगरसेवकांची पक्षविरोधात भूमिका सभागृहात वारंवार पहावयास मिळत असल्याबाबत पत्रकारांनी लक्ष्मण जगतापांना विचारणा केली. त्यावर जगताप म्हणाले की, पिंपरी महापालिकेत पहिल्यांदाच भाजपा सत्तेत आली आहे. जे निवडून येऊ शकत नव्हते, ते भाजपच्या तिकीटावर निवडून येऊन नगरसेवक झालेत. काही मोजके नगरसेवक पक्षविरोधी भूमिका मांडत असल्याचे निदर्शनास आले आहे. पक्षनेते तसेच प्रमुख पदाधिकार्यांशी त्याबाबत आमची चर्चा झाली आहे. यापुढे कोणत्याही नगरसेवकाला पक्षाच्या भूमिकेबाबत काही अडचण असल्यास त्यांनी येऊन आमच्याशी सविस्तर चर्चा करावी. थेट पक्षाविरोधात कोणी बोलले अन्यथा भूमिका घेतली तर त्यांची आता व्यवस्था करणार आहे. पक्षविरोधात बोलणार्या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या कारभारा विरोधात बोलणार्या नगरसेवकांची संख्या कमी नाही. विशेष म्हणजे यात भाजपा नगरसेवकांचीच संख्या जास्त असल्याचे बोलले जाते. भाजपाचे स्थानिक (गाववाले) नगरसेवक यात अग्रस्थानी असतात. आता खुद्द शहराध्यक्षांनाच या पक्षविरोधी बोलणार्या नगरसेवकांना कारवाईचा दम दिला आहे. त्यामुळे हे नगरसेवक भविष्यात काय भूमिका घेतात आणि जगताप त्यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.