बहुजन समाज पार्टीचे युवा नेते प्रशांत डोळस यांचे आवाहन
येरवडा : पक्षाची ताकद वाढविण्यासाठी गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन बहुजन समाज पार्टीचे युवा नेते प्रशांत डोळस यांनी केले. जन कल्याणकारी दिन व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त विश्रांतवाडी येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेश महासचिव किरण आल्हाट, प्रदेश सचिव काळुराम चौधरी, मिलिंद भोसले, सुभोत कांबळे, मेनका कराळेकर, राजेश भेंगळे, नितीन भवार, निलेश माने उपस्थित होते.
दिलेली जबाबदारी सांभाळा
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात ताकद वाढविण्यासाठी पक्षाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी पण कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळा. आगामी लोकसभा व विधानसभा पार्श्वभूमीवर विविध पक्षाच्या माध्यमातून जनतेपर्यंत मोर्चे बांधणी सुरू असली तरी पण इतर पक्षांना निवडणुका जवळ आल्या की, जनतेच्या मुख्य अडचणी समजतात व त्यावेळेस अनेक पक्षातील राजकीय नेते हे जनतेची दिशाभूल करण्यासाठी व राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विकासकामांच्या आश्वासनांची खैरात करतात. मात्र निवडणुका झाल्या की, राजकीय नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो, असे डोळस यांनी सांगितले.
नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य
आम्ही विकासकामांच्या मुद्यासह आश्वासनांची खैरात न करता सर्वसामान्य नागरिकांचे असणारे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील, याला प्राधान्य देतो. त्यामुळे वडगाव शेरीत पक्षाची ताकद वाढत असल्याचे चित्र दिसून येत असून यापेक्षा ही अधिक ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन डोळस यांनी केले.