पक्षाची प्रतिमा मालिन करणार्‍या शेट्टी यांना निलंबित करा – नगराध्यक्ष सुरेखा जाधव

0

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्याकडे दिले निवेदन

लोणावळा : खोट्या बातम्या पसरवून शहरामध्ये पक्षाची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील नागरिकांमध्ये, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये कारण नसताना उगाचच संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. पक्षातील वातावरण गढूळ करण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे पक्षाचे माजी शहराध्यक्ष धर्मेंद्र उर्फ बाबा शेट्टी यांना पक्षातून तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्याकडे केली आहे. हॉटेल चंद्रलोक येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेतवरील माहिती नगराध्यक्षा जाधव यांनी पत्रकारांना दिली. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे नगरसेवक देविदास कडू, ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर, पक्षाच्या सहयोगी अपक्ष नगरसेविका मंदा सोनवणे, स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब जाधव, माजी शहराध्यक्ष राजेंद्र चौहान, जेष्ठ नेते रामविलास खंडेलवाल, अरुण लाड, हर्षल होगले, सुनील तावरे, समीर इंगळे, विलास इंगुळकर, दीपक कांबळे आदी उपस्थित होते.

खोटी बातमी केली प्रसिद्ध

लोणावळा नगरपरिषदेत भाजपाची सत्ता आहे. सत्तेत आल्यावर पावणे दोन वर्षांपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदावर नवीन चेहर्‍याला संधी देण्याच्या मुद्द्यावरून शहर भाजपामध्ये सध्या दोन गट पडल्याचे चित्र आहे. आणि यातूनच निर्माण झालेल्या वादातून लोणावळा शहर भाजपचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या शहरातील 180 पदाधिकार्‍यांसह आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे एका पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले होते. यावर बाबा शेट्टी यांनी त्यांच्या पदाचा आणि त्यांच्या लेटरहेडचा गैरवापर करीत काही मोजक्या सहकार्‍यांना सोबत घेऊन 180 कार्यकर्त्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिल्याची खोटी बातमी प्रसिद्धीला दिली असल्याचा आरोप करीत नगराध्यक्षा जाधव यांनी वास्तविक एकाही सदस्याने स्वखुशीने स्वतः वैयक्तिक राजीनामा दिला नसल्याचा दावा केला आहे.

शहरासाठी मुबलक निधी

आमदार बाळा भेगडे यांच्या सहकार्यातुन आणि सर्व नागसेवकांच्या प्रयत्नातून आतापर्यंत लोणावळा नगरपरिषदेला 70 कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी प्राप्त झाला आहे. शहरात सर्वत्र विकासकामे सुरू आहेत आणि या सर्वांमध्ये स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब जाधव यांचा मोलाचा वाटा आहे. शहरातील अनेक प्रलंबित प्रश्‍न बाळासाहेब जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मार्गी लागले असल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी फार घाई करण्याची गरज नसल्याचे नगराध्यक्षा जाधव यांनी यावेळी सांगितले. शहरात पक्ष देखील वाढत आहे. मात्र असं सर्व चांगले सुरू असताना बाबा शेट्टी यांच्यामुळे पक्षांतर्गत वातावरण गढूळ होत असल्याचा आरोप नगराध्यक्षा जाधव यांनी केला आहे. सध्या शहर भाजपला अध्यक्ष नसल्याने एक जबाबदारी म्हणून आपणच पक्षाची प्रभारी म्हणून काम बघणार असून नाराजांची समजूत काढून मध्यमार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही नगराध्यक्षा जाधव यांनी स्पष्ट केले.

एवढे पदाधिकारी आहेत का?

माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी यांनी यांच्या सोबत 180 पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. मात्र मुळात शहरात एवढे 180 पदाधिकारी आहेत का, असा महत्वाचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. एवढे पदाधिकारी असतील तर त्या पदाधिकार्‍यांची नावं त्यांच्या पदासह शेट्टी यांनी जाहीर करावी असे आवाहन उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पत्रकार परिषदेद्वारे शेट्टी यांना केले आहे. तसेच स्वीकृत सदस्य निवडीबाबत कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचा दावाही पुजारी यांनी केला आहे.