पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष निवडीवरून पक्षात निर्माण झालेल्या पेचामुळे निवडणुकीत दगाफटका बसू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: अध्यक्ष निवडीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी मंगळवारी (दि.11) रात्री भाजपच्या दहा आणि एका अपक्ष नगरसेवकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करा, काही वेडेवाकडे केल्यास नगरसेवकपद रद्द करेन, असा इशारा दिला होता, अशी जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी डावलल्याने ’ना’राजीनामाचे नाट्य घडविणारे राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी शरणागती पत्कारली. निवडणुकीला हजर राहून पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले.
अध्यक्ष निवडीवरून भाजपमध्ये पेच निर्माण झाला होता. आमदार महेश लांडगे समर्थक नाराज झाले होते. त्यांनी राजीनामा देऊ केले होते. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवाराला दगाफटका बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. शहर भाजपचे राजकारण अनियंत्रित झाले होते. याबाबतची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: सूत्रे हाती घेतली.
नाराज दोन्ही उमेदवारांचे मतदान
पालिकेतील भाजपच्या दहा आणि एका अपक्ष नगरसेवकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री दूरध्वनी केला. भाजपच्याच अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याची तंबी दिली. जर काही दगाफटका केला. तर, नगरसेवक पद रद्द करण्यात येईल अशी तंबी दिल्याची, चर्चा आहे. चार सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत भाजपचा घाम काढला. राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे हे अखरेपर्यंत उमेदारीवर ठाम राहिले. त्यांनी मतदान घेण्यास भाग पाडले. भोंडवे यांना चार मते पडली. तर भाजपच्या ममता गायकवाड यांना 11 मते पडली. त्यांनी सात मतांनी भोंडवे यांचा पराभव केला. अध्यक्षपदासाठी डावलल्याने ’ना’राजीनामाचे नाट्य घडविणारे राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी शरणागती पत्कारली. दोघांनीही निवडणुकीला हजर राहून पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले.
दोन्ही आमदारांमधील वैमनस्य उघड
दरम्यान, स्थायी अध्यक्ष निवडीत काही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तब्बल दीड तास पालिकेत तळ ठोकून बसले होते. तर, आमदार महेश लांडगे यांनी स्थायी समिती अध्यक्ष निवडीकडे पाठ फिरविली. यामुळे दोन्ही आमदारामध्ये राजकीय वैमनस्य निर्माण झाल्याची, चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोणाच्या सांगण्यावरून नव्हे, तर मी स्वत: कारभार करणार!
नूतन अध्यक्षा ममता गायकवाड यांची ग्वाही
स्थायी समिती अध्यक्षपद हे शहर विकासाचे निर्णय घेण्याचे महत्त्वाचे पद आहे. या पदाचा उपयोग शहरात लोकाभिमुख प्रकल्प राबविण्यासाठी करणार असल्याची ग्वाही स्थायी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा ममता गायकवाड यांनी दिली. तसेच कोणाच्या सांगण्यानुसार नव्हे तर मी स्वत: कारभार करणार असल्याचेही, त्यांनी सांगितले. स्थायी समितीच्या 34 व्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली. या पदावर निवड झालेल्या त्या दुसर्या मागासवर्गीय महिला आहेत. निवडीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना शहर विकासासाठी पदाचा वापर करणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार जगताप, महापौर नितीन काळजे, मावळत्या अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट सिटीला गती देणार
गायकवाड म्हणाल्या, भाजपने माझ्यावर विश्वास दाखविला आहे. माझ्या पक्षाने दाखविलेला हा विश्वास मी सार्थ करून दाखविणार आहे. महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केल्यानंतर पक्षाने गेल्या वर्षभरात शहर विकासाचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. समाविष्ट गावांतील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पावले उचलली आहेत. शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश आहे. या योजनेला गती देण्याची जबाबदारी माझ्यावर असणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील जास्तीत जास्त बेघरांना घरे देण्याचा प्रयत्न असेल. निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
गाव सातारा, शिक्षण दहावी
दरम्यान, स्थायी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा ममता गायकवाड या प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्या वाकड-पिंपळेनिलख प्रभागाच्या नगरसेविका आहेत. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्या मूळच्या सातारा जिल्ह्यातील आहेत.