‘पक्षातील गटबाजी खपवून घेणार नाही’

0

पुणे । पक्षात कोणी गटबाजी करत असेल तर खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भाजपचे नेते, पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिला. त्यांच्या इशार्‍याचा रोख खासदार संजय काकडे यांच्या दिशेने होता.गेल्या आठवड्यात भाजपच्या 35 नगरसेवकांनी खा. काकडे यांची भेट घेतली आणि शहरातील विकास कामांचा आढावा घेतला. ही बैठक म्हणजे काकडे यांचे शक्तीप्रदर्शन मानले जाते. या घटनेचे पडसाद भाजपमध्ये उमटले. बापट यांनी सोमवारी घाईघाईघाईने भाजप नगरसेवकांची बैठक घेतली. त्यापाठोपाठ ते महापालिका भवनातही आले. तिथे एका पुस्तक प्रकाशनानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.

भारतीय जनता पक्षात पक्ष मोठा मानला जातो. त्यामुळे या पक्षात गटबाजीला थारा नसतो आणि त्यातूनही कोणी गटबाजी करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही, असे बापट यांनी ठणकावून सांगितले. कोणी कुठे बैठक घेतली, कोणी बोलावली होती आणि तिथे किती संख्या होती हे काही पाहायला मी जाणार नाही, असे सांगत काकडे यांकडील बैठकीचा सामाचार त्यांनी घेतला. पुणेकरांना चांगल्या कामाची आश्‍वासने आमच्या पक्षाने दिली आहेत आणि पुण्याचे अहित होईल असे कोणतेही काम भाजप करणार नाही, असे बापट यांनी समान पाणी पुरवठा योजनेबद्दल काकडे यांनी घेतलेल्या आक्षेपांना उद्देशून स्पष्ट केले. समान पाणी पुरवठा योजनेतील तांत्रिक गोष्टी महापालिका आयुक्त दुरुस्त करतील एक चांगली सेवा देणे आमचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले. नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना बापट यांनी आणखी चांगले काम करून दाखवा, असा सल्ला दिला.