पक्षातील नाराजांमुळे मुख्यमंत्री अडचणीत!

0

मुंबई : वेगळ्या विदर्भाची मागणी करत भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीपासून आत्मबळ यात्रा काढली आहे. विदर्भ वेगळा हवा आणि तो नसल्यामुळे शेतकर्‍याचे हाल होत आहेत, असे देशमुख यांचे म्हणणे आहे. जर सत्य बोलणे म्हणजे बंडखोरी असेल, तर मी बंडखोर आहे, असे म्हणत देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांनाच आव्हानच दिले आहे. भाजप नेतृत्वावर नाराज असलेल्या खासदार नाना पटोले यांनी यापुर्वीच राजीनामा दिला आहे. आता आशिष देशमुख सुद्धा राम राम ठोकणार अशी चर्चा आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचे पक्षांतर्गत धोरण मुख्यमंत्री सतत राबवित असल्याने खडसेदेखील नाराज आहेत. त्यामुळे भाजपमधील नाराज नेते उघडपणे नाराजी व्यक्त करू लागल्याने आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढील अडचणीत वाढतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

देशमुखांचा राजीनाम्याचाही इशारा
विदर्भाच्या जनतेने सरकार बदलले, पक्ष बदलले, मात्र विदर्भातील शेतकर्‍यांच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही. बेरोजगारीच्या दृष्टीने तरुणांचे प्रश्न सुटले नाहीत, असे म्हणत आशिष देशमुखांनी आपल्याच सरकारला चपराक दिली आहे. यापुर्वी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र मीडियात प्रसिद्ध झाल्याने त्यांना पक्षाकडून नोटीस मिळाली आहे. त्यातच ते आता स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन करत असल्याने देशमुख मुख्यमंत्र्यांसाठी त्रासदायक ठरणार आहेत. काही दिवसांपूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुखांनी राजीनाम्याचाही इशारा दिला होता. भाजप खासदार नाना पटोले यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर आता आशिष देशमुखही बंडाच्या पावित्र्यात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. शिवाय, राजकीय वर्तुळात चर्चाही तशा सुरु आहेत. आशिष देशमुख हे नागपूरमधील काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. उच्चशिक्षित असलेल्या आशिष देशमुखांनी ग्रामविकासाचा पासवर्ड पुस्तकही लिहिले आहे.

खडसेंना दूर सारून राणेंना पायघड्या
जमीन घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यासदंर्भात चौकशीला मुख्यमंत्र्यांकडूनच उशीर लावला जात असून खडसे यांना शक्य तेवढे मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्याचे राजकारण खुद्द फडणीवस खेळत असल्याचे मत खडसे समर्थक खासगीत व्यक्त करत आहेत. नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेण्यास जेवढी उत्सुकता मुख्यमंत्री दाखवत आहेत, तेवढी उत्सुकता खडसेंसारखे ज्येष्ठ नेत्याचे पुनर्वसन करण्यासाठी दाखवत नसल्याचे अनेकदा त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. खडसे यांनीही जाहिर सभांमधून आपली नाराजी यापुर्वी व्यक्त केली आहे. खडसेंसारखा अनुभवी नेता मंत्रिमंडळाच्या बाहेर असल्याने त्याचा तोटा होत असला तरी पक्षांतर्गत स्पर्धक नको याच भावनेतून त्यांना लांब ठेवले जात असल्याची चर्चा आहे. या नाराज नेत्यांची संख्या वाढत चालली असून भाविष्यात यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच अडचणीत वाढ होऊ शकते, अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.