पक्षाने मोठा पल्ला गाठला!

0

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या भाजपच्या पहिल्याच संसदीय दलाच्या बैठकीला संबोधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. ’इंदिरा गांधी जेव्हा सत्तेत होत्या. तेव्हा त्यांची 18 राज्यात सत्ता होती. एकेकाळी आपल्या पक्षाचे दोनच खासदार होते. मात्र कठोर मेहनतीमुळे आज आपली 19 राज्यात सत्ता आहे. आपल्या पक्षाने मोठा पल्ला गाठला आहे. मात्र खासदारांना सातत्याने मेहनत करावीच लागणार आहे,’ असे मोदी म्हणाले.

गुजरातचे मुख्यमंत्री कोण?
भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आले तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. गुजरातमध्ये कमी जागा मिळाल्याने मुख्यमंत्रिपदासाठी विजय रुपाणी यांच्या नावासह अनेक नावांवर विचार सुरू आहे. त्यात पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुखभाई मांडविया यांच्या नावांचाही समावेश आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडविण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि सरोज पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोघेही शुक्रवारी गुजरातला जाऊन निवडून आलेल्या आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

हिमाचलसाठी नीर्मला सीतारामण पर्यवेक्षक
हिमाचल प्रदेशातील मुख्यमंत्री ठरविण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री नीर्मला सीतारामण आणि नरेंद्रसिंह तोमर पर्यवेक्षक म्हणून शिमलाला पाठविण्यात आले. तिथे ते सर्व आमदारांना भेटणार असून त्यांच्याशी नव्या मुख्यमंत्र्यांबाबत चर्चा करणार आहेत. याच बैठकीच्या वेळी केंद्रीय मंत्री कृष्णा राज आजारी पडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ही बैठक निर्विघ्न पार पडली.