खिर्डी । हतनूर धरण जलाशय हे खान्देशातील महत्वाचे पाणथळ क्षेत्र आहे व त्याला जागतिक स्तरावर ‘वेटलँड इंटरनॅशनल व बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ने ‘आयबीए’ म्हणचेच महत्वपूर्ण पक्षी अधिवास क्षेत्र जाहीर केलेले आहे, मात्र याठिकाणी असलेल्या विविध दुर्मिळ प्रजातींच्या पक्षांना सुरक्षा मिळून त्यांचे संवर्धन होण्यासाठी याला शासनाकडून संरक्षीत क्षेत्र घोषित होणे आवश्यक आहे, त्यासाठी शासनाने या जलाशयाला पक्षी अभयारण्य आणि रामसर बनविणे गरजेचे आहे यासाठी ज्या पूर्तता असतात त्या हे जलाशय पूर्ण करते.
संवर्धन करण्याची गरज
हतनूर धरण जलाशय संरक्षित क्षेत्रासाठी लागणार्या सर्व बाबींची पुर्तता याठिकाणी दिसून येते. त्यामध्ये 20 हजारांच्यावर पक्षी संख्या असणे, विविध धोकाग्रस्त पक्षी मोठ्या संख्येने आढळणे या बाबी या परिसरात दिसून येतात. यामुळे याबाबींकडे पर्यावरण विभागाने देखील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणार्या येथील दुर्मिळ प्रजातींच्या पक्षांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
पक्षी अभयारण्य म्हणून मान्यता देण्याची मागणी
त्यामुळे हतनूर धरणाला रामसर दर्जा देण्याची मागणी जळगाव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्थेनेे केली आहे. चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य गेल्या अनेक वर्षांपासून चातक हतनूर धरण परिसरातील पक्ष्यांची गणना करीत असून त्यांनी हतनूर धरणाला पक्षी अभयारण्य म्हणून मान्यता देण्याची मागणी महाराष्ट्र शासन तसेच वन विभागाकडे केली आहे. त्यादृष्टीने प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे.
40-50 हजार पक्षांचा विहार
गेल्या चार वर्षात चातक निसर्ग संवर्धन संस्थेने धरण परिसरात केलेल्या पक्षी गणनेत 2013 मध्ये 25 हजार पक्षी, 2014 मध्ये 27 हजार पक्षी, 2015 मध्ये 22 हजार पक्षी आणि यावर्षी 19 हजार पक्षी तलाव परिसरात आढळून आले. विशेष म्हणजे पक्षीमित्रांनी तलावचा केवळ 30 ते 40 भागातील पक्षांची गणना केली. याचा अर्थ किमान 40-50 हजार पक्षी धरण परिसरात विहार करीत असावेत असा कयास करायला हरकत नाही. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता शासनाने या परिसराच्या विकासासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.