पक्षी स्थलांतराचा अभ्यास होणार
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने घेतला पुढाकार : हतनूर जलाशयाचे सर्वेक्षण
खिर्डी (सादिक पिंजारी) : जळगाव जिल्हा हतनूर जलाशयासाठी प्रसिद्ध असून हतनूर जलाशय महत्वपूर्ण पक्षी आणि जैवविविधता क्षेत्र घोषित झाल्यानंतर सार्या भारताचे लक्ष याकडे वेधले गेले आहे. पक्षीप्रेमी आणि एकूणच निसर्ग प्रेमी स्थलांतरीत पक्ष्यांना पाहण्यासाठी ऑक्टोबर ते एप्रिल या काळात या जलाशयाला भेट देत असतात आणि प्रत्येक भेटीत एक प्रश्न मनात नेहमीच घेऊन जातात की हे स्थलांतरीत पक्षी कोठून येतात आणि कोठे जातात. हतनूर जलाशय आणि परीरसरात अनेक प्रकारच्या पाणपक्ष्यांसह इतर अनेक पक्षी मोठे लालसरी, छोटे लालसरी, नयनसरी, वारकरी, वैष्णव, चक्रवाक, कलहंस, राजहंस, नकटे, थापटे, तलवार, भुवई, चक्रांग, शेंडी, मलिन, काणुक, अडई, विविध करकोचे, शराटी, भोवते, तुतारी, टिलवे, माशीमार, तिरचिमण्या, धोबी, वटवटे कमी आधिक प्रमाणात वास्तव्यास येत असतात. दरम्यान, मध्य आशियन महामार्गावरील प्रवासी पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी बाँम्बे हिस्ट्री नँचरल सोसायटी सदस्यांच्या एका चमुने हतनूर जलाशयाचे सर्वेक्षण केले आहे
पक्ष्यांना मिळणार आता ओळख खूण
जलाशय आणि सभोवतालचा अधिवास, पक्ष्यांच्या प्रजाती आणि संख्या याबाबतच्या प्राथमिक नोंदी घेण्यात आल्यात. यानंतर स्थानिक पक्षी अभ्यासकांच्या मदतीने संपूर्ण जलाशयाच्या पक्षीनोंदी घेण्यात येतील. दरम्यान, पक्ष्यांची प्राथमिक माहिती गोळा होताच विशिष्ट प्रजातींच्या पक्ष्यांना या शास्रज्ञांमार्फत रिंगिग करण्यात येणार आहे. रींगींग ही एक प्रकारची त्या-त्या पक्ष्याची ओळखखुण असते. यावर कुटभाषेतील क्रमांक आणि अक्षरे असतात. पक्षी स्थलांतर करून ज्या भागात जाणार असेल तेथील पक्षी अभ्यासकांच्या निर्दशनास असा पक्षी आल्यास त्याची कुटभाषेतील ओळखखुण पटविली जाते आणि यावरून त्या पक्ष्यांचा स्थलांतराचा मार्ग ठरविला जातो.
‘हतनूर जलाशय रामसर क्षेत्र होण्यासाठी प्रतीक्षेत’
हतनूर जलाशय महत्वपूर्ण पक्षी आणि जैव विविधता क्षेत्र घोषित झाल्यानंतर रामसर क्षेत्र होण्यासाठी प्रतिक्षेत आहे. स्थानिक पक्षी अभ्यासक आणि पक्षीप्रेमी ई-बर्ड या जगविख्यात वेब साईटवर येथील पक्ष्यांची माहिती पुरवित असतात. या माहितीमुळे पक्षीप्रेमी, पक्षी अभ्यासक यांच्यासह पक्षीशास्रज्ञ यांनादेखील हे जलाशय अभ्यास करण्यासाठी खुणावू लागले आहे. मानवाने स्थलांतर करण्यासाठी जसे विशिष्ट मार्ग निवडलेले असतात तसेच हे पक्षी ही आपले हवाई मार्ग ठरवून स्थलांतर करीत असतात. त्यांच्या अनेक मार्गांपैकी मध्य आशियन महामार्ग हतनूर जलाशयावरून जातो.
शास्त्रीय अभ्यास ठरणार महत्वाचा
हतनूर या महत्वपूर्ण पक्षी आणि जैवविविधता क्षेत्रात बाँम्बे नँचरल हिस्ट्री सोसायटी आणि वनविभाग यांनी स्थानिक पक्षी अभ्यासकांच्या मदतीने मध्य आशियन हवाईमार्गाने स्थलांतर करणार्या पक्ष्यांचा शास्त्रीय अभ्यास सुरू केला आहे. हा अभ्यास हतनूर जलाशया सह पक्षीसंवर्धनासाठी नक्कीच उपयोगी ठरेल, असा विश्वास भुसावळचे पक्षी अभ्यासक लक्ष्मीकांत नेवे म्हणाले.
पक्षांच्या हतनूर अधिवासाची कळणार माहिती
मध्य आशियन हवाई मार्गातील स्थलांतरीत पाणपक्ष्यांच्या अनेक पाणथळ जागांमधून वनविभागाने सहा पाणथळ जागा निवडल्या आहेत. त्यातील एक हतनूर आहे. या पाण, पक्षी संवर्धनासाठी वनविभाग आणि स्थानिक पक्षी अभ्यासकांच्या मदतीने पक्षी सर्वेक्षणे करून बर्ड रिंगिंग सह या पाणथळ जागेच्या व्यवस्थापनाचा कार्यक्रम पुढील दोन तीन वर्षे राबविला जाईल. यातून आपल्याला हे पक्षी कोठून येतात आणि हतनूरचा अधिवास कसा वापरतात हे ही कळेल, असे पक्षी शास्त्रज्ञ, तुहीना कट्टी म्हणाल्या.