जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर गटामधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी 21 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी विद्यार्थी संघटनांसह राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवासेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर संघटनांच्या पदाधिकार्यांचे पॅनल व मनसे पुरस्कृत विद्यापीठ नवनिर्माण मंच अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. 10 जागेसाठी एकुण 57 उमेदवारांनी 72 अर्ज दाखल केले आहे. विशेष म्हणजे सर्वचे सर्व अर्ज वैध ठरले आहे. त्यामुळे अवैध अर्जाची वेळ निघून गेली आहे. चौरंगी लढत झाली आणि प्रत्येकी 10 जागेवर निवडणूका लढविल्या गेल्या तरी उर्वरीत 32 अर्ज शिल्लक राहतील. माघार घेतल्या नाही तर मतांचे विभाजन होऊन याचा फटका पक्ष पुरस्कृत विद्यार्थी संघटनेला बसू शकतो. हे लक्षात घेता पक्ष विरहीत अर्जाच्या माघारीसाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी विविध तंत्राचा वापर पक्षसंघटनेकडून होणार आहे.
जोरदार मोर्चेबांधणी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राधिकरण प्रतिनिधीसाठी अभ्यास मंडळ, व्यवस्थापन परिषदेच्या प्रतिनिधींच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात पार पडल्या. मात्र अधिसभा सदस्यांसाठी पदवीधर गटाची निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे घेण्यात आली नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या प्राधिकरणे देखील अद्याप गठीत झालेली नाही. 21 जानेवारी रोजी आता निवडणूक होत आहे. अर्ज भरले गेले असून निवडणूकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.
10 रोजी माघार
10 जानेवारी रोजी माघारीची अंतिम मुदत आहे. चौरंगी लढत होण्याची चिन्हे असल्याने आणि 57 जणांनी 72 अर्ज केले आहे. माघारीनंतर 40 पेक्षा अधिक अर्ज राहिल्यास पॅनेल तयार होईल व पक्षसंघटनेशिवाय निवडणूका लढविल्या जातील. पॅनेल तयार झाल्यास पक्षसंघटनेला फटका बसणार असून मतांचे विभाजन होणार आहे. मताचे विभाजन होऊ नये म्हणून पक्ष पुरस्कृत विद्यार्थी संघटनांकडून जास्तीत जास्त माघारसाठी प्रयत्न होणार आहे.