पक्ष बळकटीसाठी तळागाळातील जनतेतपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवा

0

जळगाव । विद्यमान सरकार विषयी जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. जनता पर्याय शोधत असून जनता आगामी काळात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीला पर्याय म्हणून बघू शकते. विद्यमान सरकारचे दुष्कर्म जनतेपर्यत पोहोचवा, जनता ही हुकुमशाही शासनाला हद्दपार करेल. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची विचार सरणी, ध्येय धोरणे हे तळागाळातील जनतेपर्यत पोहोचले पाहिजे. असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतिष पाटील यांनी केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल पटकरे हे जिल्ह्यात पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी 13 रोजी जिल्ह्यात येत आहे. त्यांच्या दौर्‍यानिमित्त घेण्यात येणार्‍या मेळाव्याच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यालयात आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते.

नाथाभाऊ राष्ट्रवादीत येतील !
गेल्या वर्षभरापुर्वी विविध विषयावरुन राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिला. त्यांना राजीनामा द्यायला त्यांच्याच पक्षाने भाग पाडले. आता त्यांना अधिवेशना आधी पुन्हा मंत्रीपद देण्यासाठी पक्षातुन हालचाली सुरु आहे. मंत्रीपद दिले नाही तर नाथाभाऊ हे भाजपाला रामराम ठोकुन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत दाखल होतील या भितीने त्यांना मंत्रीपद देण्यात येत असल्याची मिश्किल शेरेबाजी आमदार सतीष पाटील यांनी यावेळी केली.

मध्यावधीसाठी पक्ष सज्ज
सत्ताधारी पक्षाने मध्यावधी निवडणुका होण्याचे सुतोवाच केले आहे. यदाकदाचित राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर युती न करताही राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढविण्यास तयार असून सत्ता मिळविण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात आले. शासनाने थेट जनतेमधुन सरपंच निवडण्यासाठी विधी मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळविली आहे. राष्ट्रवादीचा याला विरोध आहे मात्र विरोध करुन निर्णय तर बदलणार नाही, उलट या निर्णयाला आव्हान समजुन गावागावात राष्ट्रवादीचा सरपंच व्हावा यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न कराव्या अशा सुचनाही देण्यात आल्या. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार वसंत मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, गफ्फार मलीक, विकास पवार, योगेश देसले, खलील देशमुख, अरुण पाटील, अ‍ॅड.सचिन पाटील, मंगला पाटील, कल्पीता पाटील यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

रिक्तपदाची नियुक्ती होणार
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष संचलीत विविध आघाड्या, सेलवरील पदे रिक्त असून या पदावर पक्ष कार्यासाठी उत्सुक असणार्‍यांची नेमणुक अजित पवार व सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत 13 रोजी करण्यात येणार आहे. पक्ष कार्यासाठी ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी पदाची जबाबदारी घ्यावे, पक्षासाठी वेळ देणार नसाल तर पदे घेऊ नका अशी सुचनाही यावेळी करण्यात आली. महिला आघाडीच्या विविध पदाची नेमणुक बाकी आहे इच्छुक महिला पदाधिकार्‍यांनी पुढे येऊन पक्ष संघटन कार्यात भाग घ्यावा असे आवाहनही आमदार पाटील यांनी यावेळी केली.