पक्ष बांधणीत राष्ट्रवादीचे ‘हेडमास्तर’ ही ठरले निष्प्रभ

0

चेतन साखरे, जळगाव:‘सोनाराने कान टोचलेलेच चांगले राहतात’ अशी आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. घरातल्या वडीलधार्‍यांचे ऐकण्यापेक्षा बाहेरच्याने खडसावून सांगितलेले अधिक सोयीचे ठरते असा साधारण समज आहे. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तशीच काहीशी अवस्था आहे. जिल्ह्यात मंत्रीपद भूषविलेल्या नेत्यांचे कुणीच ऐकत नसल्याने पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी सुरवातीच्या काळात रंगनाथ काळे यांच्याकडे जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली. शांत, मवाळ असलेल्या रंगनाथ काळेंसमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान कायम होते. काळे पक्षातील गटबाजी दूर करून पक्ष बांधणी करतील अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र निवडणूक काळातच ही अपेक्षा फोल ठरली. रंगनाथ काळे यांच्यावर देवकर गटाला फेवर करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. काळे यांच्याकडून पक्षपातीपणा होत असल्याच्या तक्रारी थेट मुंबईपर्यंत गेल्या. त्यामुळे त्यांची उचलबांगडी करून विधानसभेत एकेकाळी ‘हेडमास्तर’ म्हणून गौरविलेले आणि सध्याचे दारूबंदी खात्याचे मंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे जिल्ह्याची धुरा सोपविण्यात आली.

विधानसभेची झलक जिल्ह्यात दिसलीच नाही
शिस्तप्रिय म्हणून ना. दिलीप वळसे पाटील यांची ख्याती आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष असतांना त्यांनी चक्क ‘हेडमास्तर’चीच भूमिका बजावली होती. विरोधकांना थोपविण्यात त्यांनी चांगलीच कामगिरी बजावली होती. विधानसभेत केलेली ‘हेडमास्तरकी’ जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरेल या उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे प्रभारी म्हणून वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. शिस्तप्रिय असलेल्या वळसे पाटलांकडूनही कार्यकर्त्यांनी अपेक्षा ठेवल्या. मात्र केवळ जळगावचा धावता दौरा करून पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात त्यांनीही धन्यताच मानली. बंदद्वार बैठका घेऊन पदाधिकार्‍यांचे त्यांनी कानही टोचले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. नेत्यांप्रमाणे कार्यकर्त्यांनीही प्रभारींना गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे विधानसभेची झलक जिल्ह्यात दिसलीच नाही.

जिल्हा परिषदेवेळीचा मजेदार किस्सा
दरम्यानच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालीच नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. ज्यावेळी जिल्हा परिषदेची निवडणूक होती त्यावेळी राज्यात भाजपाचे सरकार होते. त्यामुळे पक्ष फुटण्याचा धोका अधिक असल्याने वळसे-पाटलांनी अनुभवाच्या जोरावर रणनिती आखली होती. निवडणूकीच्या निकालात राष्ट्रवादीचे पानीपत झाले आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे 16 सदस्य निवडून आले तर भाजपाचे 32, शिवसेनेचे 14 आणि काँग्रेसचे चार सदस्य निवडून आले. बहुमतासाठी भाजपाला दोन सदस्यांची गरज होती. सदस्य फुटू नये म्हणून प्रभारी वळसे पाटील यांनी शपथा घ्यायला लावत लेखी स्वाक्षर्‍या देखिल सदस्यांकडून करून घेतल्या होत्या. त्यामुळे आता सदस्य फुटणारच नाही अशा काही अर्विभावात प्रभारी राहीले. मात्र तत्कालीन मंत्री राहीलेल्या आमदार गिरीश महाजनांनी अपघाताचे नाट्य रचित राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांना हायजॅक करीत जिल्हा परिषदेवर भाजपाचा अध्यक्ष विराजमान केला. शपथा, लेखी घेऊनही राष्ट्रवादीचे तीन सदस्य फुटल्याने पक्षाची आणि हेडमास्तरांची चांगलीच नाचक्की झाली.

गटबाजीला दिले खतपाणी
जिल्हा राष्ट्रवादीचे प्रभारी दिलीप वळसे-पाटील यांनीही पक्षात गटबाजीला खतपाणी घातल्याचे त्यांचेच कार्यकर्ते सांंगतात. महिला शहराध्यक्षासह काही फ्रंटल्सच्या नेमणूका त्यांनी परस्पर केल्याचा ठपका वळसे-पाटलांवर ठेवण्यात आला. काळेंप्रमाणे वळसे पाटलांनीही पक्षाला संजीवनी देण्याऐवजी पक्षाला अपयशाच्याच खाईत लोटल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. जिल्ह्यात पक्ष बांधणीत ‘हेडमास्तरही’ निष्प्रभच ठरल्याने राष्ट्रवादीची शकले झाली.