पक्ष सोडायला भाग पाडू नका!

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा रावेरात भाजपश्रेष्ठींना इशारा; आम्ही तुमच्यासाठी केव्हाही तयार : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे खडसेंना आमंत्रण

रावेत (जळगाव) : आता बस झाले, मला उत्तर हवे आहे. पक्ष सोडण्याची माझी मुळीच इच्छा नाही, परंतु मला पक्षातून बाहेर ढकलले जात आहे, अशी खंत व्यक्त करीत मला पक्ष सोडायला भाग पाडू नका, असा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी भाजपश्रेष्ठींना दिला आहे. रावेरात आयोजित राजीव पाटील यांच्या एकसष्ठी गौरव सोहळ्यात ते बोलत होते. दरम्यान, नाथाभाऊंसाठी आम्ही केव्हाही तयार आहोत, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी एकनाथराव खडसे यांना काँग्रेसतर्फे आमंत्रण दिले आहे. या राजकीय फटकेबाजीत राजीव पाटील यांचा गौरव सोहळा चांगलाच रंगला. या नाथाभाऊंनी कोणता भ्रष्टाचार अथवा गैरव्यवहार केला असेल तर सरकारने ते जनतेसमोर दाखवावे. मी गुन्हेगार असेल तर मला तुरूंगात टाका, असेही खडसे यावेळी म्हणाले.

ढकलण्याची वाट पाहू नका!
नाथाभाऊ तुम्ही निर्णय घ्या, ढकलण्याची वाट पाहूच नका. आम्ही तुमच्यासाठी केव्हाही तयार आहोत. तुम्ही खरे स्वाभिमानी तत्ववादी नेते आहात, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. आता तरी भाजप सरकारने शेतकरीहिताचे निर्णय घ्यावे, आम्ही सत्तेत असतांना शेतकरी आत्महत्येवर, आमच्या सरकारवर 302 दाखल करण्याची मागणी केली होती. आता तुम्हीच सांगा 302 चा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे, असा सवाल उपस्थित करून खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपर टीकास्त्र सोडले.

तेव्हा राष्ट्रवादी आता काँग्रेस!
गेल्याकाही दिवसांपूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या सर्वपक्षीय गौरव सोहळ्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थिती लावली होती. तेव्हा आपण आपल्या मनातील अजित पवार यांच्या कानात सांगितल्याचे, त्यांचे वक्तव्य चांगलाच चर्चेचा विषय ठरले होते. त्यातच नाथाभाऊंनी माझ्या कानात काय सांगितले आहे, हे मी कोणालाही सांगणार नाही, असे अजित पवारांनी म्हटले होते. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. एकनाथराव खडसेंवर भाजपमध्ये अन्याय होत असल्याची भावना अजित पवार यांनीही मांडली होती. आज पुन्हा काँग्रेसतर्फे खासदार अशोक चव्हाण यांनी खडसेंवर अन्याय होत असल्याची भावना मांडली व त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचे एकप्रकारे आमंत्रणच दिले आहे.

या मान्यवरांची होती उपस्थिती
माजी विधानसभा सभापती अरुण गुजराथी, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, आमदार भाई जगताप आदींनी या सोहळ्यात मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार हरिभाऊ जावळे, खासदार रक्षाताई खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, माजी आमदार अरुणदादा पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार दत्तात्रय महाजन, संजय गरुड आदींची या कार्यक्रमास उपस्थिती होती. प्रास्ताविक माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले. यावेळी माजी शिक्षण सभापती सुरेशभाऊ धनके, सभापती माधुरी नेमाळ, उपसभापती अनिता महेश चौधरी, झेडपी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन आदी उपस्थित होते.