..तर मनपा प्रशासन कामगारांच्या खात्यात जमा करेल आक्टोबरचा पगार
जळगाव– शहरातील साफसफाईसाठी मनपा प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीला ठेका दिला आहे.मात्र ठेकेदाराकडून पगार न मिळाल्यामुळे तसेच पगार देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार कामगारांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली होती.त्यानुसार मनपा प्रशासनाने ठेदाराला नोटीस बजावली होती.दरम्यान,मंगळवारी याबाबत सुनावणी झाली असून उद्या दि.11 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत कामगारांचा पगार करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. ठेकेदाराने पगार न केल्यास ऑक्टोबर महिन्याचा पगार कामगारांच्या थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
वॉटरग्रेस कंपनीने पगार न दिल्यामुळे दि.6 रोजी कामगारांनी महानगरपालिकेसमोर आंदोलन करुन कामबंद करण्याचा इशारा दिला.तसेच ठेकेदार पगार देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निवेदन दिले होते.त्यानुसार मनपा प्रशासनाने ठेकेदाराला नोटीस देवून खुलासा करण्यासाठी सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती.त्यानुसार आयुक्त डॉ.उदय टेकाळे ,उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांच्या उपस्थित सुनावणी झाली. दरम्यान,उद्या दि.11 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत कामगारांचा पगार करण्यासाठी ठेकेदाराला मुदत देण्यात आली आहे. पगार खात्यात जमा केल्याचा पुरावा सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. ठेकेदाराने पगार न केल्यास ऑक्टोबर महिन्याचा पगार कामगारांच्या थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी दिली.