पगार नसल्याने उद्यापासून ११०० वैमानिकांचा संप !

0

नवी दिल्ली:वेतन थकवल्यामुळे जेट एअरवेजच्या नॅशनल एविएटर्स गिल्डशी संबंधित असलेल्या १,१०० वैमानिकांनी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. इंजिनिअर, व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वैमानिकांना जानेवारी महिन्यापासूनचे वेतन मिळालेले नाही. कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या जेट एअरवेजने अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मार्च महिन्याचे वेतन दिलेले नाही. त्यामुळे १५ एप्रिलपासून आम्ही उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल एविएटर्स गिल्डशी संबंधित असलेले सर्व १,१०० वैमानिक उद्या सकाळी १० वाजल्यापासून उड्डाणे बंद करतील असे गिल्डकडून सांगण्यात आले.

१६०० वैमानिकांपैकी ११०० वैमानिक सदस्य असल्याचा एनएजीचा दावा आहे. पगार मिळालेला नसल्यामुळे एक एप्रिलपासूनच उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण ३१ मार्चला १५ एप्रिलपर्यंत आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. नव्या व्यवस्थापनाला वेळ द्यायचा असल्या कारणाने हा निर्णय घेण्यात आला होता. जेट एअरवेजला पुन्हा उभे करण्यासाठी नव्याने कर्ज देण्याची योजना आहे. जेटचे संस्थापक नरेश गोयल यांनी सुद्धा संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे.