पटसंख्येअभावी शाळांना लागले टाळे

0

पालिकेच्या ५ शाळा बंद करण्याचा निर्णय घेत दुसर्‍या शाळेत समायोजन, ९ शाळापैकी ४ शाळा बंद करण्यास हरकत

कल्याण । राज्यात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या शाळा टिकविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करूनही पालिकेच्या शाळा मधील विद्यार्थ्यांच्या वाढ संख्येत वाढ करण्यास शिक्षण विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. पालिका क्षेत्रातील मनपाच्या पाहिली ते सातवीपर्यंतच्या ९ शाळामध्ये केवळ दोन आकडी संख्येपेक्षा कमी विद्यार्थ्यांची पटसंख्या असल्याने या शाळा चालवायच्या तरी कश्या असा प्रश्‍न शाळा प्रशासना समोर उभा ठाकला आहे. विद्यार्थ्यांची गळती लागलेल्या शाळा बंद करून नजीकच्या शाळेत या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला होता. नऊ शाळापैकी ४ शाळा बंद करण्यास पालकांनी हरकत घेत पटसंख्या वाढवून देण्याची हमी दिल्याने तुर्तास या शाळा बंद करण्यास स्थगिती मिळाली आहे. तर अन्य ५ शाळा पालिका प्रशासनाकडून बंद करण्यात आल्या असून या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत समायोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

कल्याण पश्‍चिम ४ शाळा बंद करण्यास पालकांनी विरोध केल्यामुळे आढावा घेतल्यानंतर या शाळेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तर डोंबिवली पश्‍चिम, शाळा क्रमांक ८७/३ भावे सभागृह डोंबिवली पश्‍चिम ही शाळा धोकादायक इमारतीत असल्याने ही शाळा बंद करून तिची शाळा क्र. २३ क्रांतीवीर चाफेकर बंधू प्राथमिक शाळा, नवापाडा, डोंबिवली पश्‍चिम या शाळेच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहे .

शिक्षण समिती सभापतींनी शिक्षकांना धरले होते धारेवर
कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मनपाच्या ६५ शाळा असून या शाळांमध्ये एकूण साडे आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली ते सातवी पर्यंत या शाळामधून शिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी ३०५ शिक्षक वर्ग कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या शाळामध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी असतील अशा शाळा बंद करून या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत समायोजन करण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून देण्यात आले होते. मात्र कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून चालविल्या जाणार्‍या ६५ शाळामध्ये पुरेशी विद्यार्थी संख्या असल्याचे सांगत या शाळा सुरु ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर पालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नगरसेविका वैजयंती घोलप यांनी पालिका शाळामध्ये धाड टाकत पटसंख्या आणि शाळेतील विद्यार्थी संख्या याची तपासणी केली असता अनेक शाळेत पटावर असलेली विद्यार्थी संख्या प्रत्यक्षात नसल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांनाचांगलेच धारेवर धरले होते.

शाळा बंद करण्याचा आदेश
शाळा क्र.४२ संत एकनाथ प्राथमिक शाळा गौरी पाडा कल्याण पश्‍चिम – विद्यार्थी पट संख्या ३२, शाळा क्र.४ कै.कृष्णराव धुळूप प्राथमिक शाळा रामबाग लेन कर.५ कल्याण पश्‍चिम – विद्यार्थी पट संख्या १९ , शाळा क्र.६ राजीव गांधी प्राथमिक शाळा हनुमान नगर कल्याण पूर्व विद्यार्थी पट संख्या१६, शाळा क्र .५४ संत राजेंद्र सुरीश्‍वरजी प्राथमिक विद्यालय मोहिली विद्यार्थी पट संख्या १२, शाळा क्र.१४ संत रोहिदास प्राथमिक शाळा काटेमानवली कल्याण पूर्व – विद्यार्थी पट संख्या १६, शाळा क्र. २३ क्रांतिवीर चाफेकर बंधू प्राथमिक शाळा नवापाडा डोंबिवली पश्‍चिम – विद्यार्थी पट संख्या १८ , शाळा क्र. ६५ महर्षी धोंडो केशव कर्वे, शाळा क्र.८२ डॉ.बाबासाहेब आंबेडकर डोंबिवली पूर्व – विद्यार्थी पट संख्या ०९, शाळा क्र. ८३ अण्णाभाऊ साठे प्राथमिक शाळा रामचंद्र नगर डोंबिवली पूर्व – विद्यार्थी पट संख्या १४ पेक्षा कमी अशी संख्या गतवर्षी होती. यंदा या नऊ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पट संख्येत अधिकच कमी होऊ लागली होती. या शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभाग प्रशासनाने घेतला.