अतिरिक्त शिक्षकसंख्येत दरवर्षी होते वाढ
धोकादायक इमारतींमुळे बहुतांश शाळा स्थलांतरीत होण्याच्या मार्गावर
देहूरोड- ‘पटसंख्येनुसार शिक्षकसंख्या’ या शैक्षणिक धोरणामुळे सरकारी शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकसंख्या दरवर्षी वाढत चालली आहे. या धोरणाचा सर्वाधिक फटका कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांमधील शिक्षकांना बसला आहे. सुरवातीच्या काळात अतिरिक्त शिक्षकांची अवघी सात असलेली संख्या आता 20 वर पोहचली आहे. येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता असून विविध कारणांमुळे शिक्षकांच्या नोकरीवर टाच येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
सरकारी इमारतींचे केले ऑडिट
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत नुकताच शहरातील सरकारी इमारतींचे स्ट्रक्चर ऑडीट करून घेतले. यामध्ये कॅन्टोन्मेंट कार्यालय परिसर, कामगार निवासी इमारत, एलआयजी मार्केट, एलआयजी क्वॉर्टर्स, स्वच्छतागृहे, मामुर्डी, किन्हई, बाजारपेठ येथील शाळा इमारती, सार्वजनिक स्वच्छतागृहे, मासे-मटण मार्केट, रुग्णालय आदी इमारतींना समावेश आहे. यापैकी अनेक वास्तू धोकादायकपणामुळे काढून टाकल्या आहेत. शेलारवाडी येथील शाळा एम.बी. कॅम्प येथील महात्मा गांधा विद्यालयाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आली आहे. किन्हई येथील शाळाही लवकरच हलविण्यात येणार आहे. शाळा एकत्रीकरणामुळे अतिरिक्त शिक्षक संख्या वाढण्याचा धोका आहे.
चालकांसाठी पदे कमी करणार
दुसरी महत्वाची बाब म्हणजे बोर्डाने सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाचे वर्ग आता सातव्या इयत्तेपर्यंत पोहचली आहेत. शहरातील इतर खासगी शाळांमध्ये सातवीच्या वर्गात थेट प्रवेशाची सुविधा नसल्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाला सातवीचा वर्ग सुरू करावा लागणार आहे. साहजिकच त्यासाठी माध्यम शिक्षकांची भरती करावी लागणार आहे. या वर्गातील पटसंख्या पाहता बोर्डाला ही भरती परवडणारी नाही. त्यामुळे मराठी, हिंदी माध्यमाच्या काही शिक्षकांना कमी केले जाऊ शकते. बोर्डाकडे वाहनचालकांची भरती अनिवार्य झाले आहे. निर्धारित कर्मचारी संख्येत बदल न करता कॅन्टन्मेंट बोर्डाला ही भरती करावी लागणार आहे. त्यामुळे सहा चालकांसाठी पाच शिक्षकांची पदे कमी करता येतील, अशी सूचना बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभजीत सानप यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत केली होती.
एकंदरीतच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शिक्षकांवर नोकरीची टांगती तलवार कायम आहे. अर्थात या शिक्षकांना बोर्डातच अन्य कामकाज करावे लागण्याची शक्यता आहे. सध्या बोर्डाकडे 11 शाळा असून यातील उर्दू, हिंदी, शेलारवाडी येथील मराठी शाळा यापुर्वीच एकत्रीत करण्यात आल्या आहेत. या सर्व शाळांमध्ये एकूण 1444 विद्यार्थी शिक्षण घेत असून एकूण 72 शिक्षक आहेत. यापैकी अतिरिक्त ठरलेले 20 शिक्षक बोर्डाचया विविध विभागात काम करीत आहेत. पुढील काही दिवसांत आणखी काही शिक्षकांवर ही वेळ येणार हे निश्चित मानले जात आहे.
तरीही शिक्षकांबद्दल नाराजी
काही वर्षांपुर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाने दहावीचे वर्ग सुरू केले. त्यात विद्यार्थ्यांची यशोगाथा अव्याहहत सुरू आहे. यावर्षी 21 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली व सर्वच चांगल्या गुणांनी यशस्वी झाले. मात्र, तरीही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शिक्षकांबाबत लोकप्रतिनिधींबाबत नाराजी आहे. बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी ती बोर्डाच्या बैठकीत उघडपणे व्यक्त केली. सदस्य आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेले अकरा महिने शिक्षण समितीचे पुनर्गठन झाले नाही.