शिरपूर । शहरातील आर. सी. पटेल इंग्लिश मेडिअम प्री- प्रायमरी स्कूल येथे नर्सरी या वर्गाचे उद्घाटन व सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत मोठया उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. शिक्षणाची सुरुवात हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा समजला जात असल्याने नुकताच आर.सी.पटेल प्री-प्रायमरी स्कूलच्या या ज्ञान मंदिरात चिमुकल्यांच्या पावलांनी सर्व वातावरण प्रफुल्लित झाले. स्कूल चेअरमन योगेश भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, मुख्याध्यापिका ज्युली थॉमस यांच्यासह प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पालकांच्या हस्ते वृक्षारोपण
दरवर्षाप्रमाणे चिमुकल्यांचे स्वागत तिलक व पुष्प वर्षावाने करण्यात आले. नर्सरीचे सर्व वर्ग सुशोभित करण्यात आले होते. सर्व चिमुकल्यांबरोबर एक छानसा खेळ व उपक्रम घेण्यात आला. यात मुलांच्या हातांचे ठसे घेण्यात आले. तसेच त्यांना विशेष एक संदेश त्याद्वारे देण्यात आले. यात 160 मुलांचा सहभाग होता. यावेळी कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका ज्युलि थॉमस, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिबेका नेल्सन उपस्थित होत्या. यानंतर स्कूल चेअरमन योगेश भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा व उपस्थित मान्यवर तसेच पालकांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. विद्यार्थी, वर्गशिक्षिका व पालक यांच्यात अतिशय चांगल्या रीतीने सुसंवाद साधण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्युली थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.