शिरपूर । प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यात सुरु असलेल्या जलपुनर्भरण कामांची पाहणी केली. भुपेशभाई पटेल यांनी बुधवार, दि. 24 मे रोजी दुपारी सुरुवातीस भाटपुरा येथील काही कामांना भेट दिली. गेल्या आठवडयात सुरु केलेल्या कामाची पाहणी केली. गावातून तांडे वस्तीतून जाणा-या व शेतीलाही नुकसानदायक असलेल्या येथील एका नाल्याचा पाण्याचा प्रवाह बदलून या नाल्याचे पाणी शिरपूर पॅटर्नच्या बंधा-यांमध्ये सोडण्यात येत आहे. या कामाची भुपेशभाई पटेल यांनी पाहणी केली. त्यानंतर अनेर धरणाच्या पाटचारीचे पाणी विहिरींपर्यंत नेवून त्या पाण्याने विहीरींचे जलपुनर्भरणाचे काम फारच वेगाने सुरु असल्याने या कामासही त्यांनी भेट देवून पाहणी
केली.
विहिरी भरल्याने शेतकरी वर्ग आनंदीत
मांजरोद परिसरातही अनेर धरणाच्या पाटचारीचे पाणी विहिरींपर्यंत नेवून त्या पाण्याने विहीरींचे जलपुनर्भरणाचे काम पाहून भुपेशभाई पटेल अगदी थक्क झाले. तेथील शेतातील विहीर 90 ते 100 फूट पर्यंत भरल्याने शेतकरी बांधवांसह त्यांनी आनंद व्यक्त केला. मांजरोद येथील ग्रामपंचायतीमार्फत गावाला पाणी पुरवठा करणा-या बोअरवेल मध्ये देखील पुनर्भरणाचे काम वेगाने सुरु आहे. शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे धरमखोयी नाल्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी सुरु केलेल्या शिरपूर पॅटर्न अंतर्गत जलसंधारणाचे काम प्रचंड वेगाने सुरु आहे. खूपच महत्वपूर्ण असलेल्या या कामामुळे परिसरातील अनेक शेतकरी बांधवांचा फायदा होणार असून भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यास मोठी मदत होईल. या सर्व कामांच्या पाहणीसाठी उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या सोबत जि.प. माजी उपाध्यक्ष के.डी.पाटील, शिरपूर बाजार समिती संचालक अविनाश पाटील, माजी पं.स. सदस्य प्रकाश चौधरी, मांजरोद येथील माजी सरपंच भुलेश्वर चौधरी, भाटपुरा सरपंच शैलेंद्र चौधरी, उपअभियंता प्रकाश पाटील, उपअभियंता दोरीक, रुपेश पाटले, रितेश पाटील यांच्यासह या सर्व गावांमधील शेतकरी बांधव, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.