शिरपूर। येथील पटेल शैक्षणिक संकुलाच्या 71 खेळाडूंनी मुंबई येथे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने सिंगापूर येथे होणार्या मॅरेथॉन स्पर्धेत खेळण्याचा संस्थेच्या खर्चाने लवकरच बहुमान मिळणार आहे. रविवार 20 ऑगस्ट रोजी या मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या. स्व.खासदार मुकेशभाई पटेल यांच्या योगदानातून एस.व्ही.के.एम. संस्था यशोशिखरावर असून या संस्थेच्या वतीने विद्यार्थी व खेळाडूंना घडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
संस्थेच्या 71 खेळाडूंची निवड मुंबई येथील मॅरेथॉन रनर अॅण्ड ट्रेनर समिर सतपाल व एस.व्ही.के.एम. संस्थेच्या स्पोर्टस् डव्हायजरी कमिटीचे मॅनेजर प्रदिप संपत यांनी केली होती. स्पर्धेचे मुख्य वैशिष्टये म्हणजे या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक पटकावणार्या संस्थेतील तीन खेळाडूंना सिंगापूर येथे होणार्या मॅरेथॉन स्पर्धेत धावण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
निवडीसाठी घेतले अथक परिश्रम
सर्व खेळाडूंची शिरपूर येथील आर.सी.पटेल फार्मसी कॅम्पसच्या मैदानावर प्रशिक्षक नियमितपणे सराव करुन घेत होते. तसेच नियमितपणे सर्व खेळाडूंचा व्यायाम, आहार व सरावाचे धडे संस्थेतील सर्व क्रीडाशिक्षक, सर्व प्रशिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून देण्यात येत होते. आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल व एस.व्ही.के.एम. संस्था, मुंबई यांच्या वतीने माजी शिक्षणमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल व संस्थेचे सहअध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी अथक परीश्रमातून नेहमीच विद्यार्थी व खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरु असतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी मजल मारुन शिरपूरचा नावलौकिक व्हावा या उदात्त हेतूने नेहमीच प्रयत्न केले जातात.