पठाणकोट मिलिट्री स्टेशनजवळ आढळली एक संशयास्पद बॅग

0

पठाणकोट । पंजाबमधील पठाणकोटमध्ये एका बॅगेत लष्कराचे तीन गणवेश आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. बॅग सापडल्यानंतर स्वाट कमांडो आणि लष्कराने लगेचच सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. पठाणकोटमध्ये भारतीय नौदलाचं तळ आहे. गतवर्षी दहशतवाद्यांनी या ठिकाणी हल्ला केला होता. ही बेवारस बॅग ममून सैन्य लष्करी छावणीत रात्री उशिरा सापडली. यामध्ये पाच शर्ट आणि दोन पँट होत्या. एका स्थानिक नागरिकाने बॅगसंबंधी माहिती दिल्यानंतर पठाणकोट शहर आणि सैन्य छावणी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. ‘आम्ही लष्कराच्या अधिकार्‍यांसोबत सर्च ऑपरेशन सुरू केले. आम्ही एका संशयिताचा शोध घेत आहोत’, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली आहे. पोलिस, लष्कर, बीएसएफकडून ठिकठिकाणी नाकेबंदी करून शोध घेतला जात आहे.

गेल्या महिन्यातही एअरबेसवर हायअलर्ट
गेल्या मार्च महिन्यात गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, पठाणकोट एअरबेसवर हायअलर्ट जारी करण्यात आला होता. एअरबेसवर सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली होती. दहशतवादी पठाणकोटला पोहोचले असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे पोलीस आणि लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केले होते.

मागील वर्षी झाला होता मोठा हल्ला
मागील वर्षी 2 जानेवारीला पठाणकोट येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. 36 तास एन्काउंटर आणि तीन दिवस कोम्बिंग ऑपरेशन सुरु होते. या हल्ल्याचा मास्टरमाइंड जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर हा होता. त्याने 1999 मध्ये कंधार प्लेन हायजॅक प्रकरणात प्रवाशांची सुटका करण्यासाठी त्याला सोडले होते. या हल्ल्यानंतर वारंवार याठिकाणी पुन्हा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.