पठ्ठे बापूराव पुरस्कार खुटेगावकर यांना जाहीर

0

हडपसर । कै. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्यावतीने देण्यात येणारा ’शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ लावणी नृत्यांगना छाया खुटेगावकर यांना जाहीर झाला आहे. तर लोकसाहित्यिक ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार लावणी गायिका नंदा सातारकर यांना, तर कै. पठ्ठे बापूराव यांचे पटशिष्य ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ शाहीर बाळासाहेब मालुसकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे व कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे यांनी दिली.

शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार रोख 15000 रुपये, डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार रोख 10,000 रुपये व बाप्पूसाहेब जिंतीकर पुरस्कार रोख 5000 रुपये, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभ मंगळवारी (दि.28) महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दुपारी 1 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लावणी महोत्सवात विजयता व कल्याणी नगरकर, रेश्मा व वर्षा परितेकर, कविता बंड निर्मित ‘ढोलकीचा खणखणाट’ या संगीत पार्टींचे कलावंत आपली कला सादर करणार आहे.लोककला क्षेत्रासाठी योगदान देणा-या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. राजश्री नगरकर, चंद्राबाई तांबे, कांताबाई सातारकर, शाहीर बाबूराव काटे, सरस्वतीबाई कोल्हापूरकर, अशा जुन्या पिढीतील नामांकीत कलावंताना लोककलेस प्रोत्साहन देणारे बाळदादा मोहीते पाटील, सिने अभिनेत्री आशा काळे यांना सन्मानित करण्यात आले होते.