पडद्याआडच अधिक घडामोडी

0

अमित महाबळ: महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून बर्‍याच घडामोडी घडताहेत. काही पडद्यासमोर तर काही पडद्यामागे. यातल्या काही गोष्टी कितीही लपवल्या, मान्य केल्या नाहीत तरीही नजरेतून सुटणार्‍या नाहीत. जळगावकरांचे महापालिकेतील घडामोडींकडे बारीक लक्ष असेल, तर विकासाची स्पर्धा आणि वर्चस्वाची लढाई ही पुन्हा एकदा सुरू झाली आहे. गेली सव्वा दोन वर्षे जळगावच्या वाट्याला काहीच नव्हते. खड्डे बुजवणे, गटारी व त्यावर ढापे बांधणे हे वगळता नजरेत भरण्यासारखी विकासकामे होत नव्हती. परंतु, अचानक 42 कोटी रुपयांच्या कामांची लॉटरी लागली आणि भाजपाला विकासाचा सूर सापडला, असे म्हणावे लागेल.

राज्य शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत 2019 मध्ये 42 कोटींच्या कामाला मंजुरी दिली होती. मात्र, नंतर काही कारणास्तव मंजूर निधीतील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही मक्तेदाराला कामांचे कार्यादेश देणे रखडले होते. आता हीच रक्कम वापरास मोकळी झाली आहे. मक्तेदाराला कार्यादेश मिळाले आहेत. जळगाव मनपात सत्ता भाजपाची, विरोधी बाकांवर शिवसेना आहे, तर राज्य पातळीवर चित्र उलट आहे. सत्ताधारी शिवसेना असून, महापालिकांना कंट्रोल करणारे नगरविकास खातेही याच पक्षाकडे आहे. विरोधक व सत्ताधार्‍यांचे सूर जुळण्यासाठी ‘एरंडोली’ करतच 42 कोटींचे काम मार्गी लागल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात कोणी, कोणासोबत कुठे-कुठे चकरा मारल्या हे गुपितच राहू देऊया. जळगावकरांनी काम होण्याशी मतलब ठेवलेला बरा. आंबे खावेत, कोयी किती आहेत हे मोजण्याच्या भानगडीत न पडलेले बरे.

महापौर भारती सोनवणे व त्यांचे पती नगरसेवक कैलास सोनवणे यांनी अनेक वर्षांची मोठी समस्या गेल्या आठवड्यात पहाटेच्या वेळी निकाली काढली. ख्वाजामियाँ चौकातील वादग्रस्त अतिक्रमण यशस्वीपणे हटविण्यात त्यांना यश आले. हा भाग प्रभाग क्रमांक सातमध्ये येतो. स्थानिक नगरसेविका दीपमाला काळे व त्यांचे पती मनोज (पिंटू) काळे यांनी हे अतिक्रमण निघावे म्हणून बराच पाठपुरावा केल्याचे अनेकवेळा दिसून आले. याच प्रभागात माजी महापौर सीमा भोळे यादेखील नगरसेविका आहेत.

पण अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत त्या स्वतः किंवा त्यांचे पती अर्थातच जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे हे कुठेही ठळकपणे समोर दिसले नाहीत. त्यामुळे आज तरी सकृतदर्शनी हे अतिक्रमण निघण्याचे क्रेडीट सोनवणे आणि काळे यांचे असल्याचे दिसत आहे. ही कारवाई शांततापूर्वक पार पाडण्यात महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचेही कौतुक करायला हवे. पण मुस्लीम समाजबांधवांनाही कसे विसरता येईल ? त्यांच्या मान्यतेशिवाय, सहकार्याशिवाय हे अतिक्रमण विनाअडथळा निघणे शक्यच नव्हते. मुस्लीम समाजातील ही ‘भाई’ मंडळी कोण आहेत, त्यांची नावे आमच्याकडेही आहेत. परंतु, त्यांनी स्वतःहून पुढे आले पाहिजे. कारण, शहराच्या विकासात त्यांचेही योगदान आहे. असो. पदड्याआडून त्यांनी सहकार्य केले तेच खूप अनमोल आहे.

येत्या निवडणुकांसाठी आ. राजूमामांना शुभेच्छा
आ. सुरेश भोळे यांना जळगावकर आपलेपणाने राजूमामा असेही म्हणतात. ते सलग दोन टर्म जळगाव शहर महापालिका मतदारसंघातून निवडून आले आहेत. परंतु, भाजपाने त्यांना ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची नवीन जबाबदारी दिल्यापासून ते शहरात कमी आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जास्त दिसू लागले आहेत. त्यापायी जळगावकरांवरील त्यांचे प्रेम कमी होऊ नये एवढीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. तशीही त्यांनी ‘ग्रामीण’ची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली आहे. भाजपाने येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्यासाठी घोषणा केली आहे. राज्यातील सरकारने पाच वर्षे पूर्ण केल्यास अजून साडेतीन वर्षांनी विधानसभा निवडणूक आणि त्याआधी लोकसभा निवडणूक होईल. भाजपा हा पक्ष स्वस्थ न बसता दूरदृष्टी ठेवून आतापासूनच कामाला लागला आहे. पक्ष आदेशानुसार आ. राजूमामा नवनवीन जबाबदारी पार पाडतील तरीही जळगावकरांनी त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात!

उपमहापौरांचा कामांचा धडाका,पण ‘स्टाईल’ कोणाची?
उपमहापौर सुनील खडके यांनी पदभार हाती घेताच कामांचा झपाटा लावला आहे. प्रभागनिहाय दौरे, समस्यांचा निपटारा, जनता दरबार याचे सुपरिणाम दिसू लागले आहेत. पदाधिकारी, नगरसेवक विकासकामांसाठी कितीही धडपड करत असले, तरी त्यात खोडा घालणारे काही अधिकारी, कर्मचारी मनपात आहेत. अशांची तक्रार उपमहापौरांनी एका पत्राद्वारे आयुक्तांकडे केली. महापालिकेतील माजी पदाधिकार्‍यांची ही कार्यपद्धती ज्यांना माहित आहे ते चटकन सांगू शकतात की, उपमहापौरांची कार्यशैली जुन्या पदाधिकार्‍यांपैकी कोणाशी मिळतीजुळती आहे. बुद्धीबळाच्या पटावर सर्वात पुढे प्यादे असतात. त्यांच्या रांगेत मागील बाजूस हत्ती, उंट, घोडे, राजा, वजीर ही मोजकीच मंडळी असतात. मनपातील राजकारण आणि बुद्धीबळाचा पट यामध्ये फरक नाही.