लोणावळा : जादूटोणा आणि बुवाबाजीची मदत घेऊन आपल्या मृत्युचा मुहूर्त काढणार्या पडद्यामागच्या खर्या सूत्रधाराला शोधून काढा अन्यथा आज (दि.22) तीव्र आंदोलन करणार असा इशारा नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी निवेदनाद्वारे पोलिस दलाला दिला. यासह 24 तास संरक्षण व या प्रकरणाचा तपास स्वतः पोलिस निरीक्षकांनी करावा अशाही मागण्या नमूद आहेत. जादूटोण्याचा प्रकारावर आपला विश्वास नसला तरी अशा अघोरी प्रकारांना खतपाणी घालणारे नतद्रष्टे समाजापुढे आलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया देत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
खर्या सूत्रधाराचा उलगडा करा
या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर उतारा ठेवणारा भोंदूबाबा संतोष पिंजन (रा.भांगरवाडी, लोणावळा) याला लोणावळा पोलिसांनी तत्काळ अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष पिंजन यांच्यासह अन्य एकावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व समूळ उच्चटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलाम 2(1),8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात केला आहे. पिंजन यांच्यासोबत आपला काहीही वाद नाही त्यामुळे हे काम कोणाच्यातरी सांगण्यावरून त्याने केले असल्याचा आरोप श्रीमती जाधव यांनी केला आहे. त्याला बोलते करत या प्रकारामागील खरा सूत्रधार कोण याचा उलगडा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदन देताना त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक बाळासाहेब जाधव, भरत हरपुडे, देविदास कडू, भाजपचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, माजी शहराध्यक्ष दादा धुमाळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.