खडकी । औंध रस्त्यावरील आंबेडकर चौकाजवळ असलेल्या पडाळे वस्तीमध्ये शुक्रवारी (दि.18) रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास मोठी आग लागली. दोन सिलिंडर फुटल्याने आगीचा मोठा भडका उडाला असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
प्राथमिक माहितीनुसार, पडाळे वस्तीमध्ये शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नागरिकांनी स्फोटाचा मोठा आवाज ऐकला. स्फोटाच्या आवाजाने नागरिक भयभीत झाले. स्फोटानंतर आग भडकलेली पाहताच काही नागरिकांनी त्वरित घरातील सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
रहिवाशांनी दाखविले प्रसंगावधान
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोचण्यास अडचण येत असल्याने या वस्तीलगत असणार्या रॉयल कॅसल या गृहप्रकल्पाच्या अग्निशमन यंत्रणेतून पाण्याची फवारणी करण्यात आल्याने आग लवकर आटोक्यात आणण्यास मोठी मदत झाली. स्थानिक रहिवासी व कार्यकर्ते यांनी प्रसंगावधान दाखवून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत झोपडी भस्मसात झाल्याचा धक्का सहन न झाल्याने एक महिला चक्कर येऊन पडली होती. तिला तातडीने रुग्णवाहिकेत उपचार करण्यात आले. अग्निशमन दलाची गाडी उशिरा आल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास उशीर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या वस्तीत सुमारे 50 घरे असून त्यापैकी सुमारे 20-25 घरांना आगीची झळ पोहचली.
सरकारी यंत्रणेकडून दखल नाही
या दुर्घटनेत संजय कांबळे, वंदना यादव, रामभाऊ अडागळे, सुरम्मा भोई, विलास केदारी, मंगल अशोक चव्हाण, श्रीकांत गायकवाड, राजकुमार आनंदा भालेराव, जयवंत साठे, रंजना काळे, नंदा माने, सोमनाथ जाधव, कलावती दुर्वेल्लू, रविंद्र कांबळे, जितेंद्र कांबळे, रेखा गायकवाड, शोभा जाधव, शशिकला पाटोळे, अनिल मोहिते इत्यादीची घरे जळुन खाक झाली. एवढी मोठी दुर्घटना घडूनही अजूनही सरकारी यंत्रणेकडून याची दखल घेतली नाही. दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कुणाशीही संपर्क होऊ शकला नाही. तसेच पाहणी करण्यासाठी कोणीही फिरकले नाही. त्यामुळे याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी येथील रहिवाश्यांनी केली आहे.
मंडपाच्या गोदामामुळे नुकसान
या आगीत 16 घरे जळून खाक झाल्याने सर्वच कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीच जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची मदत रहिवासियांना न मिळाल्याने त्यांचे अतोनात हाल झाले. आगीत घरातील सर्व सामान, धान्य, कपडे, महत्त्वाचे कागदपत्रे जळून भस्मसात झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील रहिवासी रंजना काळे यांच्या घरात लागलेली आग सर्वत्र पसरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात संजय कांबळे यांचे मंडप व डेकोरेशनचे गोदाम येथे असल्याने आग जास्तच भडकली.
या आगीत जवळपास पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. तर इतरांचे घरगुती सामान जळाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या वस्तीमध्ये बहुतांश झोपड्या या पत्र्याच्या असून या आगीत 16 झोपड्या जळून पूर्णपणे खाक झाल्या आहेत.