पतंगराव कदम आयसीयूत

0

मुंबई : गेले काही दिवस लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांची प्रकृती आणखी ढासळली असून, त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. कदम यांचे मूत्रपिंड काम करत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. कदम यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले होते. कदम गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आजारी आहेत. दरम्यानच्या काळात कदम यांची प्रकृती बिघडल्याच्या पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. या सर्व प्रकारामुळे पतंगराव कदम यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांमध्येदेखील अस्वस्थता पसरली होती. या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी प्रसिद्धपत्रक काढून पतंगराव कदम यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली होती, ते लवकरच सर्वांच्या भेटीला येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.