मुंबईतील लीलावती रुग्णालयात दीर्घआजाराने निधन
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री दीर्घआजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना अतिवदक्षता कक्षात हलविण्यात आले होते. परंतु, शरीराने उपचाराना साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या रुपाने राज्याच्या राजकीय शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांची आजच भेट घेऊन विचारपूस केली होती. कदम यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह अनेकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
सोनिया गांधीनी भेट देऊन केली विचारपूस
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पतंगराव कदम यांची प्रकृती ठीक नव्हती. मूत्रपिंडाच्या आजाराने ते अत्यवस्थ होते. त्यामुळे लीलावती रुग्णालयात डॉ. एम. बी. अग्रवाल यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. सोशल मीडियावर त्यांच्या निधनाचे वृत्तही पसरले होते. परंतु, डॉक्टरांनी वैद्यकीय परिपत्रक काढून या अफवांचे खंडन केले होते. तसेच, त्यांचे सुपूत्र डॉ. विश्वजित कदम यांनीही या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लीलावती रुग्णालयात जावून कदम यांची भेट घेतली होती. तसेच, त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती. याप्रसंगी त्यांच्या समवेत काँग्रेसचे महासचिव मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा कदमांचे चिरंजीव डॉ. विश्वजित कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सोनिया गेल्यानंतर रात्रीच्या सुमारास पतंगराव कदम यांची प्राणज्योत मालविली.
थोडक्यात परिचय…
पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोंसल या गावी झाला. गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना 4 ते 5 किलोमीटर चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावे लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले. दहावीनंतर त्यांनी सातार्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. 1964 साली वयाच्या 20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली. 1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. शिक्षण, उद्योग, मदत व पुनर्वसन अशी महत्वाची खाती त्यांनी राज्य मंत्रिमंडळात भूषविलेली आहे.