पतसंस्थांनी आर्थिक पत वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत

0
सहायक निबंधक सूर्यवंशी यांनी व्यक्त केले विचार
तळेगाव दाभाडे : सहकारी क्षेत्रातील नागरी सहकारी पतसंस्थांनी सामान्य सभासदांची आर्थिक पत वाढविण्यासाठी विशेष प्रयत्नशील असले पाहिजे,असे प्रतिपादन मावळ तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक सूर्यवंशी यांनी केले. मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, माजी सभापती विठठल शिंदे, वसंतराव खांडगे, नायब तहसीलदार स्वाती दाभाडे, सुनील वाळुंज, सोनाबा गोपाळे, सतीश खळदे, संस्था अध्यक्ष गणेश खांडगे, उपाध्यक्ष रोहिदास गाडे, नंदकुमार शेलार आदी व्यासपीठावर होते.
सहकार क्षेत्रामुळे कायापालट
सुर्यवंशी पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रामुळे महाराष्ट्राचा कायापलट झालेला आहे. नागरी पतसंस्थांमुळे सामान्य माणसांची पत वाढली पाहिजे. तसेच त्याला रोजगार प्राप्त झाला पाहिजे. हे संचालक मंडळांनी हेरून पुढची धोरणे आखली पाहिजेत. यावेळी नायब तहसीलदारपदी नियुक्त झाल्याबद्दल स्वाती दाभाडे आणि बँकेचे व्यवस्थापकपदी शुभांगी लचके यांच्या निवडीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी इयत्ता दहावीमध्ये विशेष गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वागत अध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले. तर सूत्र संचालन राजू खंडाभेर यांनी केले. अहवाल वाचन सचिव विनायक कदम यांनी केले. तर आभार संचालक सुहास गरुड यांनी केले.