धुळे : पतीचा पतीचा शोध घेण्यासाठी आलेल्या वहिनीला (भावजयीला) नणंदेने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना नुकतीच शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत भावजयी गंभीर जखमी झाली असून संशयीत आरोपी असलेल्या नणंदेविरोधात धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नणंदेविरोधात दाखल झाला गुन्हा
याबाबत सुवर्णा शंकर पाटील (45, रा.मराठा मंगल कार्यालयाजवळ, चाळीसगाव, जि.जळगाव) यांनी धुळे शहर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर नणंद सरीता राजेंद्र पाटील (सीसताराम माळीची चाळ, मिल परीसर, धुळे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुवर्णा या त्यांचे पती शंकर यांचा शोध घेत असताना नणंद सरीता यांच्याकडे आल्या. यावेळी दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला व तुझ्या पतीचा पत्ता सांगणार नाही, असे सांगत सरीता यांनी सुवर्णा यांनी अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले, असा आरोप सुवर्णा यांनी फिर्यादीत केला असून या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पाठक करीत आहेत.