चिखली : पत्नी वारंवार मित्रांमध्ये अपमान करत असल्याने तसेच वेगवेगळ्या कारणांवरून छळ करत असल्याने त्रासलेल्या पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तृप्ती जय तेलवाणी (वय 21) असे अटक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कांचन देवीदास तेलवाणी (वय 40, रा. काळेवाडी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जय देवीदास तेलवाणी (वय 25, रा. चिखली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तृप्ती हिने आपला पती जय यास घरगुती कारणावरून तसेच वारंवार पैशांची मागणी करीत छळ केला. आरोपीने स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. तसेच पतीने पैसे न दिल्याने त्यास शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. यापुढे जाऊन आरोपीने आपल्या पतीला कॅन्सर झाला असल्याचा टिक टॉक व्हिडिओ बनवून तो त्याच्या मित्रांना दाखवून पतीची बदनामी केली. पत्नीच्या या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत तपास करीत आहेत.