भुसावळ : कुटुंबात हिस्से वाटणीवरून झालेल्या वादानंतर 38 वर्षीय पतीने विष प्राशन केले तर पतीने उचललेल्या टोकाच्या पावलानंतर जगण्याच्या विवंचनेत पत्नीनेदेखील आठ व चार वर्षीय मुलींसह विहिरीत उडी घेतल्याने तिघांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील बीडगाव येथे घडली. या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
तिघा माय-लेकींचा ओढवला मृत्यू
या घटनेत विनोद विक्रम सपकाळे (38) यांनी विष प्राशन केल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून विहिरीत उडी घेतल्याने त्यांची पत्नी वर्षा सपकाळे, त्यांची मुलगी किर्ती (8) व मोनिका (4) यांचा मृत्यू झाला आहे. तीनही माय-लेकींचे मृतदेह गावाजवळील विहिरीत गुरुवारी सकाळी आढळून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना
विनोद यास जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेने बीडगाव हादरले आहे. सपकाळे परीवार खामखेडा, ता.शिरपूर येथील रहिवासी आहे. सहा.निरीक्षक किरण दांडगे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही मृतदेह विहिरीतून काढत शवविच्छेदनासाठी रवाना केले. अडावद पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.