आरएमएस कॉलनीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू ; व्हिसेरा राखून ठेवला
जळगाव- एमआयडीसीत नोकरीला असलेल्या पत्नीला व्हॉटस्अॅप केला, अन् मी मरतो आहे सांगितले. यानंतर घाबरलेल्या पत्नीने तत्काळ घर गाठले. घरी आल्यावर झोपलेल्या पतीला उठविण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाही, यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. शहरातील आरएमएस कॉलनीत मंगळवारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना समोर आली. निखिल पंकज शहा वय 33 असे मयताचे नाव आहे. त्याची नेमकी आत्महत्या, की आजारपणामुळे मृत्यू हे स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.
मूळ डहाणू मुंबई येथील रहिवासी निखिल शहा हे एका मोबाईल कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहेत. त्यांचे आई वडील मुंबईला तर ते पाच वर्षापासून पत्नी खुशबू व पाच वर्षाचा मुलगा जश सोबत आर.एम.एस कॉलनीत वास्तव्याला आहेत.
काय घडला प्रकार
निखिल यांची पत्नी खुशबू हे एमआयडीसीत एस.के.ट्रान्सपोर्ट लाईन या कंपनीत कामाला आहे. नेहमीप्रमाणे ती सकाळी कामाला गेली होती. यादरम्यान ती दुसर्या ठिकाणी नोकरी शोध असल्याने त्याठिकाणी मुलाखतीसाठी जाणार होती. सकाळी निखिलने तिला व्हॉटस्अॅपवरुन व्हिडीओ कॉल केला, मला जगायचे नाही, मी मरतो, असे सांगितले. यानंतर भेदरलेल्या खुशबूने थेट घर गाठले. घरी आल्यावर पलंगावरील पती निखिलला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र ते उठले नाहीत, यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने खुशबू तिचा भाऊ कुणाल यास माहिती दिली. माहिती मिळताच कुणालने नातेवाईकांसह आर.एस.एम कॉलनीतील घर गाठले व निखिलला जिल्हा रुग्णालयात हलविले. येथे वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले.
मृत्यूचे कारण अस्पष्ट
निखील व त्याची पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. यापूर्वीही निखिलने खुशबूला फोनवरुन मी आत्महत्या करतो, असे सांगितले मात्र प्रत्यक्षात तसे केले नाही. तसेच दुसरी बाजू म्हणजे निखिलला मायग्रेनचा त्रास होता. त्यामुळेही त्रस्त होता. त्यामुळे नेमकी निखिलले आत्महत्या केली, की त्याचा मृत्यू झाला हे कारण अस्पष्ट आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजय निकुंभ व तुषार विसपुते यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. मयताचे शवविच्छदेन करण्यात आले असून त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्याच्या अहवालातून नेमके मृत्यूचे कारण समोर येईल, असे निकुंभ यांनी बोलतांना सांगितले. दरम्यान शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून रुग्णवाहिकेतून डहाणू येथे अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आला आहे.