पती-पत्नीच्या मृत्यूने शहरातील भारंबे कुटुंब सुन्न

0

मलकापूरकडून अनुराबाद-झोडगा येथे जाणार्‍या भुसावळच्या कुटुंबावर काळाचा घाला ; एकाचवेळी निघणार दाम्पत्याची आज अंत्ययात्रा

भुसावळ- मलकापूर येथे ट्रकचा टायर फुटल्याने प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनावर ट्रक आदळून झालेल्या अपघातात 12 जणांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये भुसावळातील हितवर्धिनी पतसंस्थेचे मॅनेजर व त्यांच्या पत्नीचा समावेश आहे. अपघातात पती-पत्नी मयत झाल्याचे वृत्त भुसावळात धडकताच शहरातील भारंबे परीसराह आप्तेष्टांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शहरात गेल्या महिनाभरात अपघातासह वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल 14 महिलांसह पुरूषांनी प्राण गमावले आहेत. अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे शहरवासीयांमधून चिंता व्यक्त होत असून वाहनधारकांनी वाहन चालवताना सतर्कता बाळगावी, असा सूरही उमटत आहे.

पती-पत्नीचा जागीच मृत्यू
भुसावळातील दर्डा भवनाजवळील रहिवासी व हितवर्धिनी पतसंस्थेचे मॅनेजर प्रकाश किसन भारंबे (57) व त्यांच्या पत्नी सुरेखा प्रकाश भारंबे (50) हे दाम्पत्य मलकापूरजवळील अनुराबाद-झोडगा येथे पत्नी सुरेखा यांच्या मामाच्या नात्यातील लग्नासाठी सोमवारी सकाळी भुसावळातून रवाना झाले होते. मंगळवारी लग्न असलेतरी सोमवारी हळदीच्या कार्यक्रमासही हे दाम्पत्य हजेरी लावणार होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास हे दाम्पत्य महिंद्रा मॅक्सीमो (गाडी क्रमांक एम.एच.46 एक्स 7925) ने लग्न स्थळाकडे निघाले असतानाच मलकापूरजवळील रसोया कंपनीजवळ मुक्ताईनगरकडून अकोल्याकडे जाणार्‍या ट्रक (एम.एच.40 बी.जी.9112) चे समोरून टायर फुटून भरधाव ट्रकने मॅक्सीमो गाडीला अक्षरशः चिरडले. वाहन चालकासह भुसावळातील दाम्पत्य व अन्य 12 जण जागीच ठार झाले तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

पत्रा कापून मयतांना काढले बाहेर
महामार्गावरच झालेल्या अपघाताने महिंद्रा मॅक्सीमो गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातातील मयत व जखमींना काढण्यासाठी अपघातग्रसत वाहनाचा पत्रा कापावा लागला तर क्रेन मागवून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. अपघातानंतर सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

भुसावळात वृत्त धडकताच शोककळा
अपघातात भारंबे दाम्पत्य ठार झाल्याची माहिती कळताच भारंबे परीवारातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. भुसावळातील भारंबे कुटुंबीयांच्या जवळचे नातेवाईक तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.

पती-पत्नीवर आज अंत्यसंस्कार
मयत प्रकाश भारंबे व सुरेखा भारंबे यांच्यावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून एकाचवेळी दोघांच्या अंत्ययात्रा निघणार आहे. या दाम्पत्यास योगेश हा एकुलता एक मुलगा असून तो मुंबईत बी.ई.चे शिक्षण घेत असल्याचे आप्तेष्टांनी सांगितले. मयत प्रकाश भारंबे यांच्या पश्‍चात मधुकर व रमेश भारंबे हे दोन मोठे बंधू आहेत.

भुसावळकरांवर संकटांची मालिका : 14 जणांनी गमावले प्राण
शहरवासीयांवर संकटांची मालिका सुरू असून अपघातासह अन्य घटनांमध्ये आतापर्यंत महिनाभरात 12 जणांनी प्राण गमावले तर सोमवारी पुन्हा दाम्पत्याच्या मृत्यूने हा आकडा 14 वर पोहोचला आहे. भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या कंट्रोल रूममध्ये कार्यरत असलेले मिलिंद नारायण देशमुख हे पत्नी, दोन्ही मुलांसह 4 ते 13 मे दरम्यान सुटी घेऊन त्यांच्या भावाकडे बंगळुरू येथे गेले होते. सोमवार, 6 मे रोजी दुपारी त्यांच्या वाहनाचे टायर फुटल्याने हे वाहन ट्रॉलावर धडकल्याने या अपघातात सातही जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटना ताजी असतानाच 4 मे रोजी वरीष्ठ अभियंता राजेश भीमराज मायकल यांचा ड्युटीवर असतांना रेल्वे पुलाजवळ रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला होता तर 11 रोजी की-मॅन धुनी बद्री ठाकूर यांचा कर्तव्य बजावतांना झेडटीएस जवळ मालगाडीखाली सापडल्यान तसेच 15 मे रोजी आरपीएफचे हवालदार चंद्रकांत आढाळकर यांचा पेट्रोलिंग दरम्यान रेल्वे इंजिनाचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या घटना विस्मरणात जात नाही तोच वैष्णोदेवी येथे देवदर्शनासाठी जाणार्‍या भुसावळसह जामनेरच्या भाविकांच्या मिनीबसला अजमेर जवळील थावला पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला होता. या अपघातात भुसावळचे नगरसेवक तथा साईसेवक पिंटू कोठारी यांचे मोठे बंधू सुजित कोठारी यांचा मृत्यू झाला होता तर दुसर्‍या दिवशी सारीरका छाजेड (23) यांच्यावर अजमेर येथील व्हिक्टोरिया हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना रविवारी उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू ओढवला होता. अपघातासह अन्य घटनांमुळे महिनाभरात मृत्यू झालेल्या नागरीकांची संख्या तब्बल 14 वर पोहोचल्याने शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त होत आहे.