पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृध्देची सोनसाखळी लांबविली

0

जळगाव : दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रस्त्याने पायी जात असलेल्या शकुंतला रमेश गुजराथी (71, रा. चोपडा, ह.मु,पुणे) या वृध्देच्या गळ्यातील पंधरा हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबविल्याची घटना महाबळमध्ये उघडकीस आली असून याप्रकरणी शनिवारी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शकुंतला गुजराथी या पुण्यात वास्तव्याला आहेत. गुरुवारी त्या महाबळ परिसरातील वास्तव्यास असलेले भाऊ सुधीर भालचंद्र माळी यांच्याकडे आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी 11 वाजता रस्त्याने पायी महाबळ रोडने नवजीवन शॉपीकडे जात असताना दुचाकीवरील दोघांपैकी एकाने चालत येवून कागद पुढे करत पत्ता विचारण्याचा बहाणा केला. गुजराथी यांनी माहिती नाही असे सांगण्यापूर्वीच काही कळण्याच्या आत पत्ता विचारणार्‍या भामट्याने त्यांच्या गळ्यातील 1 तोळा वजनाची सोन्याची पोत लांबवून दोघं जण दुचाकीवरुन पसार झाले. या दुचाकीवर क्रमांक नव्हता, तसेच संशयित चोरटे 25 ते 30 वयोगटातील होते. एकाच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट होता. दरम्यान, शकुंतला गुजराथी यांनी शनिवारी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमीक तपास मनोज इंद्रेकर करीत आहेत.