पत्नीचा जाच; पतीची आत्महत्या

0

पुणे । आई-वडिलांना भेटण्यासाठी बायकोने मज्जाव केल्याने नवर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी (दि.6) दुपारी 12 वाजता येरवडा परिसरात घडला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोपालसिंग सुग्रिवसिंग चौव्हान (वय 30) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी शिलादेवी सुग्रीवसिंग चौव्हान यांनी फिर्याद दिली असून पत्नी संगीता गोपालसिंग चौव्हान हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

आई-वडिलांना भेटू दिले नाही
गोपालसिंग आणि संगीता यांचा 2014 मध्ये विवाह झाला होता. दरम्यान या दोघांना मुलगा होत नसल्याचा कारणावरून ती गोपालसिंगला आई-वडीलांना फोन करू देत नसे. तसेच रजा घेऊन गावी गेल्यास आणि आई-वडीलांना भेटल्यास गळफास घेऊन, जाळून घेऊन आत्महत्या करीन आणि तुम्हा सर्वांना अडकवेन, अशी धमकी देत असे. तसेच गोपालसिंग याला शिवीगाळ करून मारहाण करीत असे, असे तक्रारीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून गोपाळसिंग याने सोमवारी ’माझ्या आत्महत्येस माझी पत्नी जबाबदार असून तिच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, तिला शिक्षा व्हावी’ अशी चिठ्ठी लिहून ठेवत 23 जानेवारीला राहत्या घरातील सिलींग फॅनला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. पोलिस उपनिरीक्षक लोहार अधिक तपास करीत आहेत.