भुसावळ : शहरातील लोणारी हॉलजवळील म्हाडा कॉलनीतील रहिवासी श्रीकृष्ण उर्फ पंकज संतोष ठाकरे (36) यांनी पत्नीने माहेरून येण्यास नकार दिल्याने संतापाच्या भरात गळफास घेतला. बुधवारी सकाळी वाजेपूर्वी ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मृत्यूपूर्वी ठाकरे यांनी सुसाईट नोट लिहिली असून शहर पोलिसांनी ती जप्त केली आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
पंकज व त्यांच्यात पत्नीत काहीतरी वाद झाल्याने पत्नी माहेरी निघून गेल्या होत्या व पंकज यांनी पत्नीला मंगळवारी फोन लावला मात्र पत्नीने येण्यास नकार दिला. याच संतापात ठाकरे यांनी राहत्या घरातील किचनमध्ये बुधवारी सकाळी सातच्या पूर्वी ओढणीने गळफास घेतला. दरम्यान, पूजा मला मुलांनाही मारायचे होते, पण मुलांना मारण्याची ताकद नाही म्हणून त्यांना सोडून दिल कारण माझ्या ओमला आणि चेतनला तु बघितलय मी किती प्रेम करतो, ते पण तुझ्यावर तेव्हढेच प्रेम करतात, तु मला फोनवर बोलली मी नाही येणार म्हणून मी हे पाऊल उचलले आहे, अशा आशयाचा मजकूर असलेली सुसाईट नोट पंकज यांनी मृत्यूपूर्वी लिहिली आहे. शहरचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह ट्रामा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी हलवला.