भुसावळ। मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोलच्या विवाहितेची स्वतः पतीनेच भावनगर (गुजरात) जिल्ह्यात विक्री केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणातील खरेदीदार व मध्यस्थाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर पती मात्र पसार झाला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या असून शनिवारी त्यास भुसावळात अटक करण्यात आली. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर मुलींची खरेदी-विक्री करणार्या रॅकेटचा उलगडा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. खान्देशासह मराठवाड्यातील अनेक मुलींची आरोपींच्या अटकेनंतर सुटका होण्याची शक्यताही जात आहे.
खरेदीदारासह दलालाच्या आवळल्या मुसक्या
चिंचोल ता. मुक्ताईनगर येथील विवाहितेला तिचा पती मोहन भगवान सोनवणे (रा. वरणगाव) याने आरोपी नारंगभाई गोकुळभाई मेर (31, रा. कनकोट, ता. महुवा, जि. भावनगर) यास एक लाख रुपयात विक्री केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर विवाहितेच्या वडिलांनी मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर मेर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. 9 रोजी पिडीत विवाहितेसह आरोपी मेर व या व्यवहारात मध्यस्थी करणार्या रसुलभाई दाऊदभाई जोगी (65, नाना असराना, ता. महुवा, जि. भावनगर) यांना अटक करण्यात आली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षकांची गांभीर्याने दखल
गुजरात राज्यातील काही समाजात लग्नासाठी मुली मिळत नसल्याने मध्यस्थांमार्फत त्यांची खरेदी केली जात असल्याची बाब उघड झाल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे यांनी आरोपींना अटक करण्याच्या सुचना मुक्ताईनगर पोलिसांना दिल्या होत्या. खान्देशासह मराठवाड्यातील शंभरावर मुलींची या भागात विक्री झाल्याचा दाट संशय असून त्यांची सुटका करण्याचे मोठे आव्हान जिल्हा पोलीस दलापुढे आता उभे ठाकले आहे.
भुसावळातून आवळल्या आरोपीच्या मुसक्या
भुसावळातील राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्याजवळ आरोपी मोहन भागवत सोनवणे (32, रा. वरणगाव) लपून असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना मिळाल्यावरुन पथकाने सापळा रचून शनिवारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पथकात सहाय्यक फौजदार मनोहर देशमुख, हवालदार दिलीप येवले, रवींद्र गायकवाड, अशोक चौधरी, संजय पाटील, रमेश चौधरी, मिलींद सोनवणे, रामकृष्ण पाटील, प्रकाश महाजन, गफ्फार खा तडवी, योगेश पाटील, मनोज दुसाने, सुशील पाटील, महेश पाटील, दीपक पाटील, प्रवीण हिवराळे यांचा समावेश होता. आरोपीस मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.