आनंदवाडी मोग्रज येथील तीन वर्षांपूर्वीची घटना
रायगड । कर्जत तालुक्यातील आनंदवाडी मोग्रज येथील शंकर होला याने आपली पत्नी हिरा शंकर होला हिचा खून केल्याप्रकरणी त्यास अलिबाग येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. १२ वर्षे झाली तरी मुलगा झाला नाही या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी शंकर याने पत्नी हिराच्या गळ्यावर, मानेवर लोखंडी कोयत्याने वार करून हत्या केली होती.
२० फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी आरोपी शंकर होला हा चंदनानी फार्म हाउसमध्ये रोजंदारीचे कामाकरिता गेला होता. त्यावेळी त्याला जेवणाचा डबा घेऊन पत्नी हिरा नवरा काम करीत असलेल्या ठिकाणी गेली होती. त्यावेळी आरोपी शंकरने हिरा बरोबर लग्न होऊन एकच मुलगी झाली. त्यानंतर मुलगा होत नाही म्हणून रागात तिची हत्या केली. प्रकाराबाबतची हकीगत आरोपीने अनंता कडाळी यास सांगितली.
सदरप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक ए. इ. खटाळ व पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी आरोपीविरुद्ध दोषारोप सादर केले.
सदरच्या खटल्याची सुनावणी मा. अति. सत्र न्यायाधीश ए. डी. सावंत याचे न्यायालयात घेण्यात आली. या केसमध्ये सरकार पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता अड. अमित देशमुख यांनी ८ साक्षीदाराची साक्ष नोंदवली. सदर केसमधील साक्षीदार अनंता देहू कडाळी याचेकडे आरोपीने दिलेली गुन्ह्याची कबुली पुराव्यामध्ये न्यायालयाने ग्राह्य धरली.
आरोपीची मुलगी व वैद्यकीय अधिकारी भालशानकर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तसेच सरकार पक्षातर्फे आत. शासकीय अभियोक्ता अमित देशमुख यांनी न्यायालयासमोर मांडलेला पुरावा, दाखल केलेले न्यायनिर्णय व केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी शंकर होला यास कलम ३०२ च्या गुन्ह्यामध्ये जन्मठेप व रु ५००/- दंड अशी शिक्षा सुनावली.