भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा परीस्थितीजन्य पुराव्यावरून निकाल
भुसावळ- तालुक्यातील साकरीतील इंदिरा नगर भागातील विवाहितेचा पतीने चारीत्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून करीत तिच्या अंगावरील दागिने लांबवले होते. या प्रकरणी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. परीस्थितीजन्य पुराव्यावरून न्या.एस.पी.डोरले यांनी आरोपीस जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.
खुनानंतर पत्नीचे दागिनेही लांबवले
तालुक्यातील साकरी गावातील इंदिरा नगर भागातील रहिवासी व गुन्ह्यातील आरोपी पती असलेला महेंद्र रामपाल हरीजन हा आपली पत्नी आम्रपालीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून नेहमीच तिच्याशी वाद घालत होता तर पत्नी आम्रपाली ही कामधंद्यानिमित्त मुंबईतील मिरा रोड येथे कुटुंबियांसोबत वास्तव्यास होती. आम्रपाली या 17 नोव्हेंबर 2015 रोजी साकरी येथे आल्यानंतर आरोपी पतीने पुन्हा चारीत्र्यावर वाद घातला नंतर दोघेही आपापल्या घरी परतले मात्र दुसर्या दिवशी सकाळी आम्रपालीची आई तीचे घरी गेली असता मुलीच्या तोंडातून फेस येत असल्याचे व गळ्यावर व्रण असलेल्या अवस्थेत मृत पडलेली आढळली. आई संगीता जाधव यांनी तालुका पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र मुलीच्या अंगावरील दागिनेही गायब असल्याने व गळ्याभोवती लालसर निशाण दिसल्याने मुलीचा जावयाने खून केल्याची फिर्यादी संगीता जाधव यांनी दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता मात्र परीस्थितीीजन्य पुराव्यावरून न्यायालयाने आरोपी पतीस खुन केल्याचे व मयताचे अंगावरील दागिने पळविल्याचे ग्राह्य धरून कलम 302 खाली सक्तमजूरीची जन्मठेप तसेच दोन हजार रुपये दंड तसेच कलम 404 खाली दोन वर्ष सक्तमजुरी तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारतर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे या खटल्यात सहा सरकारी अभियोक्ता अॅड.विजय खडसे यांनी युक्तीवाद केला.