पत्नीनेच रचला पतीच्या खुनाचा डाव

0

बँक अधिकारी खून प्रकरण : पत्नीनेच शिवसेना नेत्याला दिली २ लाखाची सुपारी

पत्नीसह ४ आरोपी अटकेत; औरंगाबाद येथील घटना

औरंगाबाद । जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र होळकर यांची हत्या त्यांच्याच पत्नीने घडवली असल्याचे उघड झाले आहे. पती संशय घेत असल्याने सुपारी देऊन तिने हा खून घडवून आणला. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या पत्नीसह ४ आरोपींना अटक केली आहे. काल घरात घुसून होळकर यांची हत्या करण्यात आली होती. मारेकर्‍याने होळकर यांचे दोन्ही हात दोरीने बांधून त्यांचा गळा चिरला. सातारा परिसरातील छत्रपती नगरात ही धक्कादारक घटना शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास उघडकीस आली. भाग्यश्री होळकरने पतीला मारण्यासाठी किरण गणोरे, फैय्याज आणि बाबू यांना २ लाखांची सुपारी दिली होती. किरण गणोरेने सुपारी देण्यासाठी मध्यस्थी केली, तर फय्याज आणि बाबू यांनी जितेंद्र होळकर यांचा खून केला. गणोरे हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

दीड महिन्यांपासून खूनाचा कट
गेल्या दीड महिन्यापासून हा खून करण्यासाठी प्लॅनिंग सुरू होते. होळकर यांची पत्नी भाग्रश्री होळकर हिने २ लाख रुपये देऊन खून करण्याचा डाव रचला. ठरल्याप्रमाणे १० हजार रुपये आधी देऊन हा खून करवून घेण्यात आला. खुनानंतर उर्वरित एक लाख ९० हजार देण्याचे ठरले होते. तत्पूर्वीच खून करणार्‍या दोघांना आणि मध्यस्थाला अटक करण्यात आली. त्यानंतर कांबी येथून खुनाची सुपारी देणार्‍या पत्नीला अटक करण्यात आली. या प्रकरणाने अनेकांना धक्का बसला.

पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी या घटनेचा तपास केला. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, होळकर हे पैठण तालुक्यातील शेकटा गावातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.  त्यांची पत्नी भाग्रश्री ह्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यालय प्रमुख आहेत.

गळा कापून केला खून
मुलगा यश नववीत शाळेत आहे. शुक्रवारी रात्री नियमाप्रमाणे होळकर यांनी पत्नी व मुलासोबत जेवण केले. नंतर ते बेडरूममध्ये टीव्ही पाहत होते. रात्री साडे अकराला यश त्याच्या खोलीत अभ्यासासाठी गेला. त्याच्या पाठोपाठ भाग्यश्री या देखील यशच्या खोलीत गेल्या आणि झोपल्या. रात्री २ वाजेच्या दरम्यान काहीतरी आवाज येत असल्याने त्या जागी झाल्या. पाणी पिण्यासाठी जितेंद्र उठले असतील असे त्यांना वाटले. मात्र काही वेळाने गोंधळ सुरू झाला व जोरजोरात आरडाओरड सुरू झाली. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्ररत्न केला मात्र, मारेकर्‍राने यशच्या खोलीचा दरवाज्याला बाहेरून कडी लावून होती. त्यामुळे त्यांना बाहेर येता आले नाही. त्यांनी शेजारी राहाणारे पाठक यांना फोन केला. आणि घरात कोणी तरी घुसल्याचे सांगितले. पाठक यांच्यासोबत शेजारी राहाणारे काही लोक होळकर यांच्या घरी आले. त्यांनी यशच्या खोलीचा दरवाजा उघडला. यश आणि भाग्रश्री या दोघांची सुटका केली. नंतर भाग्रश्री या धावत बेडरूमकडे गेल्या असता जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

पोलिसांना टाकले भ्रमात
जितेंद्र यांचे हात दोरीने बांधलेले होते. त्यांचा गळा चिरलेला होता. १०० क्रमांक डायल करून पोलिसांना ही माहिती देण्यात आली. सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक काकडे यांनी कर्मचार्‍रासह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकर्‍राविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. घरातील कोणताही सामान अस्ताव्यस्त नाही किंवा घरातून सोने, चांदी, रोकड अशी कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेलेली नाही. त्यामुळे मारेकरी हत्या करण्याच्या उद्देशाने आले होते का मग चोरीच्या? असा संभ्रम निर्माण झाला होता.