पत्नीला जाळून मारणार्‍या पतीला जन्मठेपेची शिक्षा

0

धुळे। तालुक्यातील सोनगीर येथे शुल्लक कारणावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळणार्‍या तिच्या पतीला धुळे जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोनगीरपासून जवळच असलेल्या वाघाडी येथे राहणार्‍या शैलाबाईने तिचा पती अभय नाना पाटील याला झोपेतून जेवणासाठी उठविले.

त्या रागातून 14 ऑक्टोबर 2015 रोजी संध्याकाळी 7 वाजता अभय पाटील यांनी शैलाबाईच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. गंभीररित्या भाजल्याने शैलाबाईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नरडाणा पोलिसांत आरोपी अभय पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बावस्कर यांच्या कोर्टात हा खटला चालला. 22 जून रोजी न्यायालयाने अभय पाटीलला दोषी मानून जन्मठेपेची आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनविली. दंड न भरल्यास त्याला 3 महिने साधी कैद भोगावी लागणार आहे. नरडाणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन प्रकरण न्यायालयापुढे ठेवले.