नालासोपारा :- माहेरहून मोटारसायकल आणण्यासाठी पत्नीकडे तगादा लावणारा तसेच दारुच्या तर्र नशेत तीच्या अंगावर डिझेल ओतून तीला जिवंत जाळणार्या मद्यपी पतीला वसई सत्र न्यायालयाने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. वसई सत्र न्यायालयाचे न्या.एस.जे.भारुका यांनी आज ही शिक्षा सुनावली. रामजी गोपीनाथ यादव (38) असे न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
विरार पूर्वेतील गोकुळवाडीतील आत्माराम पाटील चाळीत रामजी गोपीनाथ यादव व सौ.दुर्गावती रामजी यादव (35) हे दाम्पत्य राहत होते. आरोपी रामजी यादव हा त्याच्या पत्नीकडे माहेरहून मोटरसायकल आणावी यासाठी दिड वर्षांपासून तगादा लावून होता. त्यातच तो कोणताही कामधंदा करीत नसल्याने व त्याला दारुचे व्यसन असल्याने दारुच्या नशेत मोटरसायकलची मागणी पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळवाद करायचा. 9 नोव्हेंबर 2012 रोजी रात्री 11 वाजता रामजी यादव हा दारुच्या नशेत घरी आला. त्याची पत्नी त्याला जेवण वाढत असताना त्याने तीला पुन्हा शिविगाळ करण्यास सुरुवात केली. रात्रीची वेळ असल्याने आजुबाजुचे लोकं झोपलेले आहेत तुम्ही शिविगाळ करु नका असे त्याच्या पत्नीने त्याला सांगितले. याचा राग मनात धरुन राग अनावर झालेल्या रामजी यादव याने घरातील ड्रममधील डिझेल पत्नीवर आतून तीला जिवंत पेटवून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुर्गावती यादव यांना जखमी अवस्थेत भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू 14 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी विरार पोलीसांनी आरोपी रामजी यादव याच्या विरोधात कलम 302, 498 (अ), 504 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. या घटनेचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक वाय.के.चौरे यांनी आरोपी विरोधात सबळ पुरावा न्यायालयात सादर केला होता. या प्रकरणावर आज सुनावणी देताना न्यायालयाने आरोपी रामजी यादव याला दोषी ठरवून त्याला दहा वर्षांच्या कारावासाची तसेच पाच हजार रुपये दंडाची व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ऍड.उज्वल्ला मोहळकर यांनी काम पाहिले.