अमळनेर । तालुक्यातील टाकरखेडा येथील दारू पिण्यास पैशे दिले नाहीत म्हणून पत्नीस जिवंत जाळून मारल्याप्रकरणी अमळनेर न्यायालयाने आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तालुक्यातील टाकरखेडा येथे आरोपी विजय साहेबराव पाटील (वय 39) हा 17 ऑक्टोबर 2015 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पत्नी कविताकडून दारू पिण्यासाठी पैशे मागत होता परंतु तिने पैशे न दिल्यामुळे आरोपीने तीस शिवीगाळ करीत मारहाण करून तिच्या अंगावर बसून तिला रॉकेल टाकून जाळून घटना स्थळावरून पळ काढला होता. त्यावेळी गावातील पोलीस पाटील यांनी कविताला विझवून उपचारासाठी धुळे येथे हलविले होते परंतु कविता दुसर्याच दिवशी मयत झाली होती.
मयत पत्नी व मुलाची साक्ष ठरली महत्वाची
धुळे येथे रुग्णालयात तिने मृत्यूपूर्व जबाब देऊन सर्व हकीकत कार्यकारी दंडाधिकारी के.पी. बोर्डे व के.एम. गायकवाड यांना सांगितले होते.त्यावरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करुन आतापर्यंत आरोपी अटकेतच होता. घटनेचा तपास एपीआय प्रवीण कदम हे करीत होते. सदर खटल्यात 10 साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यात मयतने दिलेला मृत्यूपूर्व जबाब, मुलगा दीपक विजय पाटील (वय 11), डॉ. कुवर, डॉ. गढरी यांची साक्ष महत्वाची ठरवत न्यायमुर्ती दिनेश कोठलीकर यांनी भादवी कलम 302 प्रमाणे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मुलगा दीपक व ओम यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सदर खटल्याचे सरकार पक्षातर्फे किशोर बागुल मंगरूळ कर यांनी काम पाहिले.